कुख्यात पपड्याचा राज्यभर धुमाकूळ : टोळीवर मोक्काचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:24 IST2018-09-21T15:23:34+5:302018-09-21T15:24:44+5:30
कोळपेवाडी येथे सराफाची हत्या करून दरोडा टाकणाऱ्या पपड्या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाणार आहे. टोळीचा प्रमुख सूत्रधार पपड्या उर्फ राहुल व्यकंटी काळे याची दहा वर्षांची गुन्हेगारी विश्वातील माहिती जमा करण्यात आली आहे.

कुख्यात पपड्याचा राज्यभर धुमाकूळ : टोळीवर मोक्काचा प्रस्ताव
शिवाजी पवार
श्रीरामपूर : कोळपेवाडी येथे सराफाची हत्या करून दरोडा टाकणाऱ्या पपड्या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाणार आहे. टोळीचा प्रमुख सूत्रधार पपड्या उर्फ राहुल व्यकंटी काळे याची दहा वर्षांची गुन्हेगारी विश्वातील माहिती जमा करण्यात आली आहे. ती पाहून वरिष्ठ पोलीस अधिकारी चक्रावून गेले आहेत.
दरोडा प्रकरणात आज अखेर पोलिसांनी तिघा सराफांसह १६ आरोपींना अटक केली आहे. दुकानाची रेकी करणाºया पपड्याच्या दोन बायका उमा व रेखा यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. श्रीमंत्या ईश्वर काळे, पप्पू उर्फ प्रशांत लष्कºया काळे यांच्यासह प्रमुख सदस्य अजूनही फरार आहेत. आरोपी नगरसह, बीड, औंरगाबाद, वर्धा, उस्मानाबाद, परभणी येथील असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी दिली. अटकेत असलेल्या सुंदरलाल भोसले व पपड्याची मानलेली मुलगी नितू यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आहे. त्यावरून वेगाने तपासाची सूत्रे हलविली जात असल्याचे पवार यांनी सांगितले.
मूळचा पूलगाव (जि.वर्धा) येथील पपड्या याचा राज्यातील सर्वात खतरनाक गुन्हेगारांमध्ये समावेश होतो. राहुल, महादू, गणपती अशी नावे त्याने धारण केली आहेत. २००६ मध्ये लालखेड (जि.यवतमाळ) येथे एका पोलीस उपनिरीक्षकाचे पिस्तुल हिसकावून घेत त्याचीच हत्या केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. याशिवाय दरोड्याचे २५ हून अधिक तर हत्येचे ५ ते ७ गुन्हे असल्याची माहिती पवार यांनी दिली. आणखी काही गुन्हे असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथील तुरुंगातून पसार होण्याचा कारनामाही त्याच्या नावे आहे. दरम्यान, टोळीतील प्रमुख सदस्य असलेले श्रीमंत्या व पप्पू हे यापूर्वी कुख्यात नांगºया गँगचे सदस्य होते. मध्य प्रदेशातील झाबुआ गँगची दरोडा टाकण्याची पद्धत या दोघांना अवगत आहे.
समाज बांधवांमध्ये देखील पपड्याची मोठी दहशत आहे. त्याचे अनेक नातेवाईक गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहेत. बुरूडगावमधील (अहमदनगर) तिघा बहिणींशी पपड्याने विवाह केला आहे.
कोळपेवाडी येथील दरोड्याचा तपास ही कठीण होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे जाळे भक्कम असल्याने तपास लागला. पपड्यसह साथीदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे, असे श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.