कोरोनाबाबत जिल्ह्यात कुचकामी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST2021-04-27T04:22:15+5:302021-04-27T04:22:15+5:30
अहमदनगर : तालुकानिहाय दौऱ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत अवलोकन केले. औषधे, उपचार आणि उपाययोजना यामध्ये कोणतीही सुसूत्रता ...

कोरोनाबाबत जिल्ह्यात कुचकामी उपाययोजना
अहमदनगर : तालुकानिहाय दौऱ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत अवलोकन केले. औषधे, उपचार आणि उपाययोजना यामध्ये कोणतीही सुसूत्रता नसल्यानेच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपाययोजना कुचकामी ठरत असून साधी औषधी देखील उपलब्ध नसल्याचे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात मांडले आहे.
मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या दोन आठवड्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय दौरे करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. तेथील स्थानिक अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशीही चर्चा केल्याने स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात आली. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, त्यासाठी केले जाणारे उपचार, उपाय याबाबत थोरात यांनी अवलोकन केले असून परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सदरचे पत्र थोरात यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर ते ट्वीटही केले आहे.
संशयितांचे स्वॅब घेतल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल येण्यासाठी किमान २४ ते ४८ तासांचा अवधी लागतो. या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही. अनेक तालुक्यांमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट किटही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णांच्या चाचण्या न झाल्याने, रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते. खरे तर वस्तुस्थिती तशी नाही. कोरोना पॉझिटिव्ह आलेले ८५ टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणातून बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक औषधे सहजपणे शासकीय रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये सद्य स्थितीत उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची परिस्थिती खालावून त्यांना पुढील उपचार देणे गरजेचे ठरते. तरी सदर औषधे उपलब्ध होण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. नागरिकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर एचआरसीटी चाचणी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. पर्यायाने स्कॅनिंग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणे कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहेत.
---
एचआरसीटी-रेमडेसिविरबाबत धोरण हवे
रुग्णालयात दाखल करताना डॉक्टर एचआरसीटीच्या अहवालाचा आग्रह धरतात. याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआरसीटी न करणे व आवश्यकता नसताना एचआरसीटी करायला न लावणे याबाबत धोरण ठरविणे आवश्यक आहे. अनेक डॉक्टर रुग्णांना आवश्यकता नसतानाही, रेमडेसिविर इंजेक्शनचा आग्रह धरताना दिसतात. याबाबतही राज्यस्तरावर रेमडेसिविर वापराबाबत स्पष्ट निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना देणे आवश्यक आहे, असे थोरात यांनी या पत्रात म्हटले आहे.