इंडियन सिमलेस बंद

By Admin | Updated: June 12, 2014 00:11 IST2014-06-11T23:50:04+5:302014-06-12T00:11:03+5:30

अहमदनगर: येथील सिमलेस कंपनीतील कायम व कंत्राटी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत़

Indian Simlose Closer | इंडियन सिमलेस बंद

इंडियन सिमलेस बंद

अहमदनगर: येथील सिमलेस कंपनीतील कायम व कंत्राटी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत़ पगारवाढीच्या मागणीसाठी बैठक घेतल्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापनाने बुधवारी सकाळी उत्पादन बंद करत असल्याचे जाहीर करत रिव्हर्स गियर टाकला असून, दीड हजार कामगारांची नोकरी धोक्यात आली आहे़ त्यामुळे नागापूर परिसरात कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे़
नागापूर औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीने उत्पादन बंद केल्याची घटना ताजी असतानाच सिमलेस कंपनीनेही बुधवारी रिव्हर्स गियर टाकला आहे़ सिमलेसचे तीन स्वतंत्र युनिट आहेत़ त्यामध्ये जवळपास एक हजार ५०० कामगार कार्यरत आहेत़ यापैकी ५५० कामगार कायमस्वरुपी आहेत तर इतर कामगार कंत्राटी आहेत़ हे सर्व कामगार नेहमीच्या वेळेवर बुधवारी सकाळी कंपनीत आले होते़ परंतु उत्पादन बंद करत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून जाहीर करत कामगारांना घरी जाण्यास सांगण्यात आले़ त्यामुळे एकच गोंधळ उडाला़ उत्पादन का बंद केले, याची कोणतीही माहिती कामगारांना
देण्यात आली नाही़
पूर्व सूचना न देता युनिटमधील विद्युतपुरवठा बंद करण्यात आला़ पुरवठा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर उत्पादनच बंद आहे,असे कामगारांना सांगण्यात आले़
तिन्ही युनिटमधील उत्पादन पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आल्याचे फलक प्रवेशव्दारावर लावण्यात आले़ परंतु कामगार प्रवेशव्दारावरच थांबले़
काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली़
मात्र व्यवस्थापनाने काम बंद करत असल्याचे सांगितल्याने घरी न जाता कामगारांनी रस्त्याच्या बाजूला झाडाच्या सावलीचा आधार घेतला़ दुपारपर्यंत व्यवस्थापनाकडून कोणताही निरोप आला नाही़ केवळ पुढील सूचना आल्यानंतर या, असे सांगण्यात आल्याने व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत कामगारांनी अखेर कंपनी परिसरातून काढता पाय घेतला़
(प्रतिनिधी)
कामगारात भितीचे वातावरण
कायमस्वरुपी कामगारांना दर तीन वर्षांनी पगारवाढ दिली जाते़ मात्र आॅर्डर मिळत नाहीत, कंपनी तोट्यात आहे, अशी कारणे देऊन व्यवस्थापनाने पगारवाढ देण्यास नकार दिला़ वेळोवेळी मागणी करूनदेखील दखल घेतली नाही़ त्यामुळे नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने कंपनीच्या आवारात काल मंगळवारी कामगारांची बैठक घेतली़ बैठकीसाठी कंपनी व्यवस्थापनाकडून रितसर परवानगी घेतली होती़ मात्र बैठक घेण्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापनाने उत्पादन बंद केले, असे कामगारांचे म्हणणे आहे़ कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे़
व्यवस्थापन व कामगारांत धुसफूस
कंपनीकडून सुविधा पुरविल्या जात नव्हत्या़ त्यामुळे वेळोवेळी कामगार कार्यालयाकडे कामगारांनी तक्रारी केल्या़ कामगार आयुक्तही आले़ परंतु काहीच सुधारणा झाली नाही़ तसेच पगारवाढ देण्यात येत नव्हती़ ही धुसफूस गेल्या अनेक दिवसांपासून होती़ असा दावा काही कामगारांनी केला आहे.
व्यवस्थापनाची भूमिका गुलदस्त्यात
दरम्यान याप्रकरणी कंपनीने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. दिवसभराच्या घडमोडीनंतर अधिकाऱ्यांशी संपर्काचा प्रयत्न केला असता त्यांनी याविषयावर बोलण्यास असमर्थता दर्शविली.
कंपनी तोट्यात़़़़
सिमलेस कंपनीचे येथील युनिट तोट्यात आहे,असे वारंवार सांगण्यात येते़परंतु हे सर्वात पहिले युनिट आहे़ त्यानंतर बारामती, जेजुरी, चंद्रपूर आणि स्वीडनमध्ये या कंपनीने युनिट सुरू केले आहे़ हे युनिट नफ्यात असूनही तोट्यात असल्याचे सांगण्यात येत आहे,असे कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़
कामगार
कायमस्वरुपी- ५५०
कंत्राटी- १०००

Web Title: Indian Simlose Closer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.