विसापूर तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:17+5:302021-06-29T04:15:17+5:30
श्रीगोंदा : बेलवंडी (ता.श्रीगोंदा) परिसरातील बारा गावांना वरदान ठरणाऱ्या विसापूर तलावाची साठवण क्षमता वाढवावी, अशी मागणी काँग्रेसचे श्रीगोंदा ...

विसापूर तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवा
श्रीगोंदा : बेलवंडी (ता.श्रीगोंदा) परिसरातील बारा गावांना वरदान ठरणाऱ्या विसापूर तलावाची साठवण क्षमता वाढवावी, अशी मागणी काँग्रेसचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. भोसले यांनी संगमनेर येथे थोरात यांची भेट घेऊन नुकतीच त्यांच्याशी चर्चा केली.
विसापूर हा कुकडी प्रकल्पातील एक टीएमसी पाणी साठवण क्षमतेचा तलाव आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे विसापूर तलावाखालील दहा-बारा गावांचा शेती सिंचन व पिण्याचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस अडचणीचा होत चालला आहे. त्यामुळे या तलावाची साठवण क्षमता दोन टीएमसी करणे आवश्यक आहे, असे दीपक भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, हा प्रश्न यापूर्वी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांनी मांडला होता. तुमच्या सर्वांच्या भावना विचारात घेऊन विसापूरची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उंची वाढविणे सोपे, की खोली वाढविणे सोपे याबाबत विचार करू. एक टीएमसीवरून ते धरण दोन टीएमसीपर्यंत नेण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना भेटू, असे आश्वासन थोरात यांनी दिले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाचपुते उपस्थित होते.
---
२८ दीपक भोसले
दीपक भोसले यांनी संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी विसापूर धरणाबाबत चर्चा केली.