पुरेशा पावसाअभावी टँकरच्या संख्येत वाढ

By Admin | Updated: July 10, 2014 00:35 IST2014-07-09T23:43:57+5:302014-07-10T00:35:56+5:30

अहमदनगर: जिल्ह्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे टँकरच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली असून,पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टँकरची व्यवस्था करण्यात आली

Increase in the number of tankers due to insufficient rainfall | पुरेशा पावसाअभावी टँकरच्या संख्येत वाढ

पुरेशा पावसाअभावी टँकरच्या संख्येत वाढ

अहमदनगर: जिल्ह्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे टँकरच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली असून,पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे़पाऊस नसल्याने ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीचा ओघ सुरू असल्याने टँकरच्या संख्येत आणखी वाढ होईल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे़
जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे़ मात्र पावसाला जोर नाही़ त्यात जून महिनाही पूर्णपणे कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यावरील पाणी टंचाईचे संकट कायम आहे़ खबरदारीचा उपाय म्हणून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेच्या अहवालानुसार, टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांची संख्या २५० वरून २६४ वर पोहोचली आहे़ जुलैच्या पहिल्या आठवड्यात टँकरने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या वाड्या वस्त्यांची संख्या १ हजार १५३ होती़ मात्र त्यात आता वाढ झाली असून, ही संख्या १ हजार २५० झाली आहे़ पाऊस न झाल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ सध्या जिल्ह्यात ३३७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ दररोज किमान २० टँकरची भर पडत असून, वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी टँकरचा आधार घेण्यात आला़
जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा व भंडारदरा धरणाने तळ गाठला आहे़ धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव करण्यात आले आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून आवर्तन सुटले नाही़ त्यामुळे लाभक्षेत्रात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़ या परिसरातूनही टँकरची मागणी होऊ लागली आहे़ पाणी योजना नसलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे़ टंचाईबाबत उपाय योजनांना थेट निधी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत़ टँकरची मागणी केल्यास तातडीने टँकर उपलब्ध व्हावा, यासाठी तहसीलदारांना टँकरचे अधिकार देण्यात आले असून, आता तहसील कार्यालयाकडून टँकर सुरू केले जात आहेत़ त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना काही अंशी दिलासा मिळाला आहे़ पावसाने आणखी ओढ दिल्यास अनेक गावे व वाड्या- वस्त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)
कुठे किती टँकर
संगमनेर- ४६,अकोले- १३, कोपरगाव- ९, राहुरी-१, नेवासा- ४, राहाता-१०, नगर-४१,पारनेर-४४, पाथर्डी- ७९, शेवगाव-२५, कर्जत-४०, जामखेड-१९, श्रीगोंदा-६

Web Title: Increase in the number of tankers due to insufficient rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.