तुरुंगात टाकण्याची दिली धमकी, पीआयसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
By शिवाजी पवार | Updated: December 19, 2023 17:13 IST2023-12-19T17:12:52+5:302023-12-19T17:13:13+5:30
श्रीरामपुरातील घटना : पोलिस ठाण्यात तरुणांना मारहाण प्रकरण.

तुरुंगात टाकण्याची दिली धमकी, पीआयसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून पोलिस निरीक्षकासह दोघा पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलिसांनी फिर्यादीला अशी वागणूक दिली होती.
याप्रकरणी सूरज राजकुमार यादव (वय २१, वार्ड क्रमांक सहा) याने फिर्याद दाखल केली होती. यावरून तत्कालीन तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलिस कर्मचारी चांद पठाण व हबीब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आता सोमवारी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
तालुक्यातील कारेगाव येथे २२ फेब्रुवारी २०२३ मध्ये मित्र ओंकार उर्फ भोला साळवे याने अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडत असल्याची माहिती दिली. त्यावरून ११२ क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घरी आले. चांद पठाण याने शिवीगाळ सुरू केली. बळजबरीने गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेले. मित्र साळवे यालाही तेथे आणण्यात आले. पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. मोबाइल हिसकावून घेतले. पोलिसांना खोटी माहिती पुरविली. मुलगी अल्पवयीन नसून यात पडू नये, असे धमकावले. पोलिसांनी कुटुंबीयांनाही वाईट वागणूक दिली, असे यादव याचे म्हणणे आहे.
जखमी यादव हा शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी गेला असता डॉक्टरांनी कारण विचारले. त्यावर त्याने घडलेला प्रकार सांगितला. तेथे जबाब घेण्यासाठी शहर पोलिस ठाण्यातील हबीब शेख दाखल झाले. त्यांनीही या प्रकरणात न पडण्याचे सांगत दबाव आणला. अखेर आपण गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना घडलेल्या अन्यायाची माहिती पत्राद्वारे कळविली. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात जबाब नोंदवून घेण्यात आला. पोलिस ठाण्यातील मारहाणीचे चित्रण माहिती अधिकारात मागितले असता ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यादव याने न्यायालयात धाव घेतली होती.