यंत्रयुगातही पारंपरिक दगडी वस्तूंचे महत्त्व टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:03+5:302021-01-03T04:21:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिचोंडी पाटील : आजच्या आधुनिक युगात सर्वत्र वीज उपकरणाचा सर्रास वापर सुरू आहे. असे असले तरीही ...

यंत्रयुगातही पारंपरिक दगडी वस्तूंचे महत्त्व टिकून
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचोंडी पाटील : आजच्या आधुनिक युगात सर्वत्र वीज उपकरणाचा सर्रास वापर सुरू आहे. असे असले तरीही आपण पारंपरिक पद्धतीनुसार दैनंदिन उपयोगात वापरली जाणारी दगडी उपकरणे आपले स्थान टिकवून आहेत. याचा अनुभव चिचोंडी पाटील येथे मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड येथील संभाजी धोतरे या कुटुंबाने डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात दगडी पाटे, वरवंटा, उखळ, जाते, खलबता आदी साहित्य बनविण्यासाठी लागणारे दगड आणले. त्यांनी नगर-जामखेड महामार्गावरील चिचोंडी पाटील येथे मुक्काम करत पाटे, वरंवटे व इतर उपकरणे बनविण्यास सुरुवात केली. त्यास प्रवाशांकडून चांगली मागणी आली. अवघ्या चार, पाच आठवड्यात आणलेल्या साहित्यपैकी सुमारे ७५ टक्के दगडी उपकरणाची विक्री झाली. येत्या पंधरा दिवसांत सर्व साहित्य विक्री होईल.
स्वयंपाक करताना महिला मिक्सर, ग्राईंडर आदी उपकरणाचा उपयोग करत असताना विजेअभावी खोळंबून पडतात. त्यावर उपाय म्हणून ग्रामीण भागात दगडी उपकरणास मागणी वाढली आहे. त्याचबरोबर घरात विवाह सोहळ्यात हळदीचा घाणा घालण्याची प्रथा आहे. विवाहप्रसंगी पूजनासाठी जात्याची गरज भासते. त्यामुळे ही अनेक परिवार आवर्जून जाते खरेदी करतात.
----
दगडी उपकरणास तयार करण्यात पाटा, वरवंटा किंवा उखळ तयार करण्याकरिता तीन ते साडेतीन तास वेळ लागतो. सर्वात जास्त वेळ जाते तयार करण्यात जातो. त्यास सहा ते सात तास अवधी लागतो.
-संभाजी धोतरे, सिल्लोड, जि. औरंगाबाद
, कारागीर.
.......
असे आहेत दगडी उपकरणाचे दर (रुपयात)
पाटा वरवंटा - ४०० ते ५००
उखळ- ४०० ते ४५०
जाते-६०० ते ६५०
खलबत्ता-२५० ते ३००.
..
फोटो-०२पाटा वरवंटा
...
ओळी-नगर-जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील येथे रस्त्याच्या कडेला पाटा, वरवंटा, जाते तयार करण्यात व्यस्त असताना कारागीर.