खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी करा गणेशमूर्तींचे विसर्जन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:35+5:302021-09-05T04:25:35+5:30
अरुण वाघमोडे अहमदनगर : गणेशोत्सव जवळ आला असून बाजारात शाडू मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्तींनाही मोठी मागणी ...

खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी करा गणेशमूर्तींचे विसर्जन !
अरुण वाघमोडे
अहमदनगर : गणेशोत्सव जवळ आला असून बाजारात शाडू मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्तींनाही मोठी मागणी आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पीओपीच्या मूर्तींचेही घरच्या घरी विसर्जन शक्य आहे. त्यासाठी मूर्ती विसर्जित केलेल्या पाण्यात खाता सोडा मिसळावा लागतो. दोन ते अडीच दिवसांत मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळून जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
यंदा गणेशोत्सव काळात कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. मूर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. शाडू मातीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती स्वस्त मिळत असल्याने या मूर्तींची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या मूर्ती नदी, विहीर, तळ्यात विसर्जित केल्याने त्या लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे प्रदूषण वाढण्याचा धोका असतो. मात्र, घरीच खाता सोड्याचा प्रयोग करून या मूर्तींचे विसर्जन करणे शक्य आहे. निर्माल्य बाजूला करून बादलीत अथवा मोठ्या भांड्यात मूर्ती विसर्जित करावी.
------------------------------
असे असावे सोड्याचे प्रमाण
मूर्तीचे जितके वजन आहे तितकाच सोडा पाण्यात टाकावा. दोन ते तीन तासांनी ते पणी ढवळावे. दोन ते अडीच दिवसांत पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळून जाते. मूर्ती विरघळून तयार झालेले पाणी आमेनियम सल्फेट असते. यात आणखी पाणी मिसळून ते झाडांना खत म्हणूनही वापरता येते.
--------------------
यंदा गणेश मूर्तींना चांगली मागणी आहे. शाडू मातीसह पीओपीच्या मूर्तीही ग्राहक खरेदी करत आहेत. बहुतांश भाविक खाता सोडा वापरून पीओपीच्या मूर्तींचे घरी विसर्जन करतात. बाहेरील जिल्ह्यातूनही नगरच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे.
- किशोर रोकडे, मूर्तिकार
---------------------
पाण्यात खाण्याचा किंवा वापरण्याचा सोडा टाकला तर साधारणत: दोन दिवसांत मूर्ती विरगळून जाते. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींचेही घरीच विसर्जन करणे शक्य आहे. यातून पर्यांवरणाचे संवर्धन होते. मूर्तीचे विसर्जन करताना मूर्तीच्या वजनाइतकाचा सोड्याचा वापर करावा.
- अक्षय लाटने, मूर्तिकार
------------------------
पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री
शाडू मातीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्तींची अधिक विक्री होते. नगर शहरातच गणेश मूर्तींचे १५० कारखाने आहेत. या कारखान्यात वर्षभर मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. गणेशोत्सवानिमित्त या कारखान्यातून लाखो मूर्ती तयार होतात. जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि इतर राज्यांतही नगरमधून मूर्ती पाठविल्या जातात.