उड्डाणपूल मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:11+5:302021-06-10T04:15:11+5:30
अहमदनगर : नगर शहरामध्ये हॉटेल अशोका ते सक्कर चौक या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या मार्गावरील दोन्ही बाजूच्या ...

उड्डाणपूल मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा
अहमदनगर : नगर शहरामध्ये हॉटेल अशोका ते सक्कर चौक या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या मार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर माती पडलेली आहे, तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघात होत असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
स्थायी समिती सभापती घुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोठी रस्त्यालगत जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. सदर भाग काळ्या मातीचा आहे. त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत, तसेच पुलाच्या कामाची माती रस्त्यालगत टाकल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच एका तरुणाला जीव गमवावा लागला. सध्या पावसाचे दिवस सुरू असून, काळी माती रस्त्यावर येवून रस्ता निसरडा झाला आहे. शहरातील अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये- जा सुरू झाली आहे, तसेच अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावर पडलेली माती उचलावी. खड्डे बुजवावेत. रस्त्याचे मजबुतीकरण करावे. आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणे करून अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी, अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची राहील, असे घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.