तत्काळ कर्जमाफी द्या
By Admin | Updated: May 6, 2016 23:28 IST2016-05-06T23:21:54+5:302016-05-06T23:28:47+5:30
जामखेड : राज्यात भीषण दुष्काळस्थिती असल्यामुळे आम्ही दोन विधानसभा अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली, परंतु याकडे दुर्लक्ष झाले.

तत्काळ कर्जमाफी द्या
जामखेड : राज्यात भीषण दुष्काळस्थिती असल्यामुळे आम्ही दोन विधानसभा अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली, परंतु याकडे दुर्लक्ष झाले. आता उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीचा विचार करा म्हणून सूचना केली आहे. याचा विचार करून शासनाने तत्काळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ काढण्याच्या कामाची अजित पवार यांनी शुक्रवारी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. पवार यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश धस, जामखेडच्या नगराध्यक्षा प्रीती राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, युवक अध्यक्ष मयुर डोके, प्रदीप पाटील, बापूराव ढवळे, संदीप गायकवाड, राजू गोरे हजर होते.
अजित पवार म्हणाले, निम्मा महाराष्ट्र दुष्काळी आहे. टंचाईस्थिती भीषण असल्याने केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना करावी. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून दुष्काळाला सामोरे जावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००८ साली सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. त्यामुळे आता कर्जमाफी करावी. आताची दुष्काळस्थिती पाहून शरद पवार यांनी पक्षाची बैठक घेऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार पक्षाने मराठवाड्यात नदीचे खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली.
२०१२ साली भुतवडा तलावातील गाळ काढण्याच्या शुभारंभासाठी आलो होतो. तलावातील गाळ निघून पाणीसाठा वाढावा, हा यामागे हेतू होता. त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन ते तीन दिवसांच्या कालावधीनंतर पाऊस झाल्याने गाळ काढण्याचे बारगळले. सध्या लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम चालू आहे. यासाठी ४२ लाखाचा निधी जमा झाला आहे, परंतु तलावातील गाळ पाहता निधी कमी आहे. यासाठी शासनाने मदत द्यावी. तसेच उद्योजक व मोठ्या कंपन्या दुष्काळ निवारणासाठी निधी देणार आहेत. त्यातील निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अजित पवार म्हणाले.
भुतवडा जोडतलावाचे काम पूर्ण झाल्यास ४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपयोगात येईल. या कामासाठी टेंडर निघाले, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लवकर रिटेंडर करून कामास सुरुवात करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मयुर डोके यांनी अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. रिटेंडरचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. यावेळी अनेकांनी अजित पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.