बारगाव नांदूर येथील अवैध वाळू उपशाची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:29+5:302021-03-24T04:18:29+5:30

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथील बेकायदा वाळू उपसा आणि एका डंपर चालकाने महिलांवर डंपर घालण्याच्या प्रकाराची चौकशी ...

Illegal sand dredging at Bargaon Nandur will be investigated | बारगाव नांदूर येथील अवैध वाळू उपशाची चौकशी होणार

बारगाव नांदूर येथील अवैध वाळू उपशाची चौकशी होणार

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथील बेकायदा वाळू उपसा आणि एका डंपर चालकाने महिलांवर डंपर घालण्याच्या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राहुरी तहसीलदारांना आदेश दिला आहे. मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा करण्याबाबत सीसीटीव्ही लावले होते का ? असतील तर फुटेज पाहून कारवाई का केली नाही? याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.

राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथील मुळा नदीपात्रात माती मिश्रित वाळूचा लिलाव अधिकृत होता. वाळू उपसा करण्याच्या कालावधीत संबंधित ठेकेदाराला ३०० ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी होती. असे असताना दररोज ५० ते ६० डंपरमधून वाळू उपसा केला जात होता. वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी, पोकलेन वापरले जात होते. दरम्यान वाळू उपसा करणाऱ्या तस्करांकडून महिलांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रकारही १ मार्च रोजी घडला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले. तसेच ग्रामस्थांनीही प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यावर डॉ. भोसले यांनी संबंधित तहसीलदारांना याबाबत विचारणा केली आहे. अवैध वाळू उपशाची, महिलांच्या अंगावर डंपर घालण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तहसीलदारांना बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू आहेे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांनी दिली.

---

सीसीटीव्ही होते का?

वाळू उपसा करताना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. बारगाव नांदूरमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले होते का? सीसीटीव्ही असतील तर परवानगीपेक्षा जादा वाळू उपसा सुरू असताना कारवाई का झाली नाही, सीसीटीव्ही नसतील तर ते लावण्यात आले होते की नाही ? याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत.

-----------

उपशाची मुदत संपुष्टात

दरम्यान मुळा पात्रातील बारगाव नांदूर येथील माती मिश्रित रेतीघाटातून वाळूचा उपसा करण्याची संबंधित ठेकेदाराची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता या नदीपात्रातून कोणालाही वाळू उपसा करता येणार नाही. यापुढे महसूल पथकांची या पात्रात करडी नजर राहणार असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांनी सांगितले.

-----------

फाईल फोटो- सॉण्ड

Web Title: Illegal sand dredging at Bargaon Nandur will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.