राष्ट्रपदी पदक विजेत्याची उपेक्षा
By Admin | Updated: July 11, 2016 00:59 IST2016-07-11T00:43:31+5:302016-07-11T00:59:35+5:30
साहेबराव नरसाळे - अहमदनगर कळसुबाई शिखराच्या पायथ्याला असणाऱ्या जंगलात ठकाबाबा गांगड यांनी आयुष्य खर्ची घालून निसर्गाची भाषा अवगत केली़

राष्ट्रपदी पदक विजेत्याची उपेक्षा
साहेबराव नरसाळे - अहमदनगर
कळसुबाई शिखराच्या पायथ्याला असणाऱ्या जंगलात ठकाबाबा गांगड यांनी आयुष्य खर्ची घालून निसर्गाची भाषा अवगत केली़ अनेक पशु-पक्ष्यांचे हुबेहूब आवाजही ते काढतात़ आदिवासी कलेच्या उद्धारासाठी झटणारे ठकाबाबा गांगड यांना केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविले. महाराष्ट्र सरकारनेही सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. मात्र, आता वृद्धापकाळात या कलाकारावर भाकरीच्या शोधात कर्जबाजारी होण्याची वेळ ओढावली आहे.
अकोले तालुक्यातील उडदावणे हे २३०० लोकसंख्येचे गाव. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कळसुबाई शिखराच्या पायथ्याला हे गाव वसले आहे. पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे, उंचच उंच पर्वतराजी आणि हिरवाईने नटलेला परिसर अशी निसर्ग संपन्नता या गावाला लाभली आहे. या गावातील आदिवासी कुटुंबात ठकाबाबांचा जन्म झाला. गावातच खडकाळ माळरानावर ३ एकर शेती आहे. पण पाणी नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर केवळ भाताचे एक पीक वगळता काहीही पिकत नाही. घरात सात माणसं आहेत. उपजीविकेचे दुसरे साधनही नाही. त्यामुळे ठकाबाबांनी आपल्यातील कला जगासमोर ठेवली. या कलेतून चार पैसे मिळत गेले. राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीही ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. अनेक संस्थांनी ठकाबाबांना पुरस्कार देऊन गौरविले. राष्ट्रपतींनी सुवर्ण पदक देऊन ठकाबाबांच्या कलेला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले.
सह्याद्रीच्या डोंगररांगात रोरावणारा वारा, धुवाँधार कोसळणारा पाऊस, फेसाळलेले धबधबे, ओढेनाल्यांचा खळखळाट, बिबट्यांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे, कुत्र्यांचे भुंकणे आणि भांडणे, कावळ्यांची कावकाव रोजच त्यांच्या कानी पडायची. जंगलात गुरे चारताना ठकाबाबांना पशु-पक्ष्यांच्या आवाजाला प्रतिसाद देण्याची सवय लागली आणि तेही पशू-पक्षांचा आवाज हुबेहूब काढू लागले. आदिवासी गाण्यांवर ठकाबाबा झक्कास ठेका धरायचे. दिल्ली येथे १९६५ सालच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यक्रमात ठकाबाबांच्या पथकाने महाराष्ट्रातून आदिवासी कलेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या कार्यक्रमाने देशात प्रथम क्रमांक पटकावला. तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हस्ते ठकाबाबा राष्ट्रपती सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
२००५ साली महाराष्ट्र सरकारनेही त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. अनेक संस्थांनी ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. ठकाबाबा सेलिब्रिटी झाले. त्यामुळे त्यांना आदिवासी वेशभूषा सोडून निटनेटके राहणीमान अंगिकारावे लागले. त्यासाठीचा खर्च करण्यासाठी ठकाबाबांना कर्ज काढावे लागले. राज्यभरात आणि इतर राज्यातही ठकाबाबांना मागणी वाढू लागली. मात्र, कलेचा प्रसार आणि प्रचार होतोय, या उद्देशाने ठकाबाबांनी जाण्या-येण्यासह किरकोळ मानधन स्विकारले. त्यांनी काढलेल्या वाघाच्या डरकाळीने अनेकांची चाळण उडाली. मात्र, आदिवासी कलेचा हा वाघ आता थकलाय. १९३२ साली जन्मलेले ठकाबाबा आता ८४ वर्षांचे आहेत. आता त्यांचे हातपाय थरथरतात.
तरीही पशु-पक्ष्यांचे आवाज पूर्वीसारखेच काढतात़ कोणीही पर्यटक आला की सांगेल त्या पशु-पक्ष्याचा आवाज काढायचा, कोणाकडेही एक रुपयाही मागायचा नाही, घरी आलेल्या पाहुण्यांना विनाचहाचे जाऊ द्यायचे नाही, असा त्यांचा दंडक़ त्यामुळे बँकेचे कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे. शेतात काही पिकत नाही अन् खायला सात तोंडं. त्यामुळे किरकोळ स्वरुपात आलेला भात अवघ्या काही दिवसात संपून जातो.
उर्वरित महिने जगण्यासाठी धान्यासह इतर सर्वकाही विकत घ्यावे लागते. बँकेच्या कर्जाचे हप्तेही वर्षानुवर्षे थकीत राहतात. बँक कर्जफेडीसाठी तगादा लावीत आहे. त्यांच्या घरात अनेक पुरस्काराचे कागदपत्र मांडले आहेत. मात्र, हे कागद खायला देत असते तर किती बरे झाले असते, अशी खंत ठकाबाबा व्यक्त करतात.
मंत्र्यांची आश्वासनेही विरली
अनेक मंत्री, मोठे अधिकारी अशा अनेकांनी ठकाबाबांची पाठ थोपटली, माहितीही नेली. कलाकाराचे मानधन देऊ असे आश्वासन दिले. पण अद्याप त्यांना मानधन मिळाले नाही. ठकाबाबांना मानधन मिळावे, यासाठी त्यांचा मुलगा सखाराम हा सरकारच्या पायऱ्या झिजवतोय. अद्याप सरकारने या कलाकाराला मानधन सुरु केले नाही. ज्यांचा वशिला असतो त्यांनी साठी ओलांडली की मानधन सुरु, इतर योजनांचा लाभही त्यांनाच दिला जातो. मात्र, ठकाबाबांचे वय ८४ वर्षे झाले आहे, तरीही सरकारच्या आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळालेले नाही.