शिक्षण आरोग्यावर परमीटरुममध्ये विचारमंथन

By Admin | Updated: September 30, 2015 13:38 IST2015-09-30T13:38:14+5:302015-09-30T13:38:14+5:30

आरोग्य विभागाने चक्क आपली मासिक बैठक नगर कॉलेज शेजारी असणार्‍या एका नव्या परमीट रुम हॉटेलमध्ये घेत आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला

Ideology on Education Health | शिक्षण आरोग्यावर परमीटरुममध्ये विचारमंथन

शिक्षण आरोग्यावर परमीटरुममध्ये विचारमंथन

>अहमदनगर : नेहमी वेगवेगळ्या प्रयोगासाठी सुपरिचित असणार्‍या नगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक-माध्यमिक शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने चक्क आपली मासिक बैठक नगर कॉलेज शेजारी असणार्‍या एका नव्या परमीट रुम हॉटेलमध्ये घेत आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे. परमीट रुम आणि जिल्हा परिषदेच्या या दोन्ही विभागाच्या बैठकांचा काही संबंध नसला तरी आरोग्य आणि शिक्षणांवर धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेतल्याने या दोन्ही विभागातील कर्मचार्‍यांनी कोणता आदर्श घ्यावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
मंगळवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या उपस्थितीत परमीट रुम हॉटेलमध्ये आरोग्य समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अश्‍विनी भालदंड, चित्रा बर्डे, डॉ. स्वाती कानडे, संगीता उदमले, डॉ. किरण लहामटे आदी उपस्थित होते. सुरूवातीला आरोग्य खात्यातील बांधकामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात ज्या ठिकाणी साथीच्या आजारांचा उद्रेक होईल, त्या ठिकाणी आरोग्य दीपस्तंभातील डॉक्टरांचा कॅम्प घेण्याचे आदेश देण्यात आले. दोन वर्षापासून रखडलेले आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांचे प्रस्ताव महिनाभराच्या आत मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या. १२ गावात पिण्याच्या पाण्याच्या शुध्दीकरणासाठी टीसीएल पावडर नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्या ठिकाणी तातडीने टीसीएल पावडर उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले. जिल्ह्यात महिनाभरात इंद्रधनुष्य योजना आणि जीवनसत्त्वाच्या डोसाची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 
त्यानंतर दुपारी दोन वाजता शिक्षण समितीची बैठक झाली. यावेळी सदस्य संभाजी दहातोंडे, नंदा भुसे, मिनाक्षी थोरात, सुरेखा राजेभोसले, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, लक्ष्मण पोले, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सुलोचना पटारे आणि गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. शिक्षण समितीच्या बैठकीत मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांच्या विषयावर चर्चा झाली. तसेच शिक्षकांनी स्वत:हून १ लाख ७५ हजार रुपये जमा करून शाळेला संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे कौतुकही करण्यात आले. 
 
 
हॉटेलमधील बैठका झाल्यानंतर जिल्हा परिषदेत बैठका झाल्या. केवळ जेवण करण्यासाठी हॉटेलात गेलो असल्याचे दोन्ही विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सांगताना दिसत होते. विशेष म्हणजे शिक्षण समितीची बैठक झाल्यानंतर या ठिकाणी आलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत पुन्हा तासभर बैठक झाली. शिक्षण समितीचे सदस्य दहातोंडे यांनी हॉटेलच्या बैठकीला हजेरी लावली. मात्र, त्यानंतर बैठकीच्या ठिकाणाबद्दल नाराजी व्यक्ती केली. आता शिक्षकांनी कोणता आदर्श घ्यावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिक्षण आणि आरोग्य समितीच्या बैठकीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल अनभिज्ञ होते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हे परिमीट रुम हॉटेल आहे. शिक्षण समितीच्या बैठकीच्या वेळी उपाध्यक्ष शेलार यांना मोबाईल करून विचारणा केली असता, त्यांनी स्पष्टपणे हॉटेलमध्ये बैठक सुरू असल्याचे सांगितले. तसेच हा अधिकार सभापतींना असल्याने ते कोठेही बैठक घेवून शकतात. यात वावगे काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी हॉटेलमधील बैठकांची माहिती दडवली. जिल्हा परिषदेचे मुख्यालय सोडून अन्यत्र कोठेही सर्वसाधारण सभा अथवा विषय समित्यांची बैठक घेण्याची वेळ आल्यास त्यासाठी अध्यक्षा यांची परवानगी आवश्यक असते. मात्र, अशी कोणतीच परवानगी शिक्षण आणि आरोग्य समितीच्या बैठकांचे सदस्य सचिव यांनी घेतली नसल्याचे अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी सांगितले. बैठकांच्या ठिकाणाबाबत तोंडी माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ■ शिक्षक बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षक संघटना पत्रकार परिषद अथवा प्रसिध्दीपत्रक काढून एकमेकांची बदनामी करतात. मात्र, यात बदनामी ही प्राथमिक शिक्षक पदाची होत असते. यामुळे यापुढे अशा प्रकारे शिक्षकांना विना परवानगी पत्रकार परिषद घेवू न देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत विषय समित्यांना बैठका घेण्यासाठी लाखो रुपये खचरून समिती सभागृह निर्माण केलेले असताना परमीट हॉटेलमध्ये कशासाठी बैठका घेतल्या, याबाबत दिवसभर जिल्हा परिषदेच्या वतरुळात कूजबूज सुरू होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. बी. गंडाळ यांच्याकडे विचारणा केली असता, आरोग्य समितीची बैठक जिल्हा परिषदेत झाली. मात्र, त्यानंतर जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेलो. ■ शिक्षण समितीच्या बैठकीत माध्यमिक शाळांच्या आवारात ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात येणार आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभाग सर्व शिक्षण संस्थांना पत्र पाठवून आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगणार आहे.
 
(प्रतिनिधी)

Web Title: Ideology on Education Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.