डाळिंब बागांना तेल्या रोगाचा विळखा
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:28:53+5:302014-07-13T00:17:04+5:30
श्रीगोंदा : डाळिंब फळबागांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे.
डाळिंब बागांना तेल्या रोगाचा विळखा
श्रीगोंदा : डाळिंब फळबागांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे. मात्र आता शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा तेल्या रोगाच्या विळख्यात सापडल्या असून, श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंब उत्पादक उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे़
हवामानातील बदलामुळे डाळिंबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो़ तेल्या रोगाबाबत शेतकऱ्यांचे अज्ञान आणि जनजागृतीच्या अभावामुळे जीवघेण्या तेल्या रोगाचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यावर डाळिंब लागवडीपासून डाळिंबाचे मार्केटिंग करेपर्यंत शेतकरी, मजूर, वाहतूकदारांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला श्रीगोंदा येथे आयोजित कार्यशाळेत तज्ज्ञांनी दिला़
श्रीगोंदा कृषी विभागाने आयोजित केलेल्या डाळिंब कार्यशाळेत राष्ट्रीय डाळिंब संशोधन सोलापूर केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. निलेश गायकवाड, दिनकर चौधरी, माऊली अॅग्रो क्लिनिकचे संचालक रमेश हिरवे, विश्वनाथ दारकुंडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी आ. बबनराव पाचपुते होते. यावेळी डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेतल्याबद्दल शेतकरी डॉ. अनिल जामदार, बाबासाहेब इथापे, पोपट खेतमाळीस, एकनाथ खेतमाळीस यांचा गौरव करण्यात आला.
श्रीगोंद्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा बहरल्या आहेत. डाळिंबातून दरवर्षी ४५० कोटींची विक्रमी उलाढाल होऊ लागली आहे. घारगाव, पारगाव, बेलवंडी, घोटवी, उक्कडगाव, लोणीव्यंकनाथ, बनपिंप्री परिसरातील २५ टक्के डाळिंब बागावर तेल्या रोगाने हल्ला केला आहे. हा रोग झपाट्याने पांगत आहे़ त्यामुळे डाळिंब बागा तेल्या रोगाच्या विळख्यात सापडल्या आहे.
तेल्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी हंगामी बहार धरणे. तेल्या रोगाबाबत एकमेकांना मार्गदर्शन करणे व सामूहिक पद्धतीने तेल्या रोगावर नियंत्रण आणून उच्चाटन करण्याचा संकल्प श्रीगोंद्यातील सुमारे ५०० शेतकऱ्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)
४पाणी व खतांचा अयोग्य वापर करणे़
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
तेल्या रोग विरहीत बागेतील किंवा नर्सरीतील रोपांची निवड करणे.
बाग छाटणाऱ्या कात्र्या निर्जंतुकीकरण करणे.
क्रेट व वाहने थेट डाळिंब बागेत न नेणे. बागेतील तेलकट पाने, फांदी, खोड जाळून नष्ट करणे. खते, पाणी, औषधांचा संतुलित वापर करणे. बागेत हवा खेळती ठेवणे. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागेचे व्यवस्थापन ठेवणे.
तेल्या रोगाची प्रमुख कारणे
डाळिंब रोपाची खात्रीशीर निवड न करणे.
डाळिंब बाग छाटणी कात्रीची निर्जंतुकीकरण न करणे.
डाळिंब वाहतुकीची साधने व बागा स्वच्छ न ठेवणे.
बुरशी नाशकांचा अयोग्य वापर करणे़
दोन रोपांतील लागवड अंतर योग्य न ठेवणे.