पारनेरचा बाजार राज्यात आदर्श मॉडेल
By Admin | Updated: March 26, 2024 18:27 IST2014-05-18T23:27:25+5:302024-03-26T18:27:07+5:30
विनोद गोळे, पारनेर बाजारात शेतकरी, व्यापार्यांना बसण्यासाठी भक्कम व विस्तीर्ण ओटे, ओट्यांमधील अंतरही भरपूर, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, झाडांची सावली,
पारनेरचा बाजार राज्यात आदर्श मॉडेल
विनोद गोळे, पारनेर बाजारात शेतकरी, व्यापार्यांना बसण्यासाठी भक्कम व विस्तीर्ण ओटे, ओट्यांमधील अंतरही भरपूर, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, झाडांची सावली, महिला-पुरुषांसाठी स्वच्छतागृहे व व्यवस्थित नियोजन, परिसर स्वच्छता यामुळे पारनेरमधील रविवारचा आठवडे बाजार राज्यासाठी मॉडेल बाजार ठरत आहे. पारनेर तालुक्याचे गाव. बसस्थानकाजवळ व कुठल्याही रहदारीला अडथळा होणार नाही अशी रचनाच पूर्वीपासून या बाजारतळावर आहे. देशभरातील स्वातंत्र्य चळवळीपासून संयुक्त महाराष्टÑ चळवळ, भूमीहिनांसाठी आंदोलनापासून आताच्या पारनेर मतदारसंघ वाचविण्याच्या आंदोलनापर्यंतच्या सर्व घटनांचे व देशभरातील प्रमुख व्यक्तींच्या सभा गाजल्याचे हे ऐतिहासिक ठिकाण असल्याने पारनेर बाजार तळाला बाजाराव्यतिरिक्त वेगळे स्वरुप आहे. हिरवीगार झाडे आणि नियोजनबद्ध विकास पारनेर बाजारतळ व परिसराची जागा विस्तीर्ण आहे. हिरवीगार झाडांनी नटलेला परिसर सर्वांची ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करतो हे मुख्य वैशिष्ट्य आहे. विजय औटी यांनी आमदार झाल्यावर या ऐतिहासिक बाजारतळाचा नियोजनबद्ध केलेला विकास सर्वांसाठी लाभदायक ठरत आहे. यामध्ये गेल्या दहा वर्षांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा महत्त्वाचा वाटा आहे. विस्तीर्ण ओटे, अंतर्गत काँक्रीटीकरण, पूर्वीचे पडलेले ओटे, पावसाळ्यात चिखलातून पायवाट काढणे असे चित्र होते. पारनेर ग्रामपंचायतीने प्रथम शेतकरी, व्यापार्यांसाठी दगडी ओट्याची व्यवस्थित बांधणी केल्यामुळे भक्कम व विस्तीर्ण ओटे केले आहेत. शिवाय दोन ओट्यांमध्ये भरपूर अंतराने कितीही गर्दी झाली तरी अडचण येत नाही.