मघा बरसल्या; खरीपाला दिलासा
By Admin | Updated: August 21, 2014 23:05 IST2014-08-21T23:01:30+5:302014-08-21T23:05:46+5:30
पावसाने जिल्ह्यात हजेरी लावत सुखद धक्का दिला आहे़ जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी आणि शेवगाव वगळता इतर ठिकाणी दिवसभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.

मघा बरसल्या; खरीपाला दिलासा
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात पावसाचे गुरूवारी पुनर्रागमन झाले़ अनुकूल वातावरण असूनही पाऊस पडत नव्हता़ पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चांगलाच धास्तावला होता़ मात्र पावसाने जिल्ह्यात हजेरी लावत सुखद धक्का दिला आहे़ जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी आणि शेवगाव वगळता इतर ठिकाणी दिवसभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.
शिर्डीत जोरदार पाऊस
शिर्डी शहरात दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे परिसरातील खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे़
कोपरगाव तालुक्यात पाऊस
कोपरगाव शहरात पाऊस झाला नाही़ मात्र तालुक्यातील कोळपेवाडी, पुणतांबा, वारी, मायगाव देशमुख, सुरेगाव, परिसरातही पाऊस पडला़एकतास झालेल्या पावसाने सखल भागातून पाणी वाहिले़ पावसाने उशिराने का होईना पण हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे़
राहाता तालुक्यात दिलासा
राहाता तालुक्यात पावसाने गुरुवारी हजेरी लावली़ तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे़ पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला़ दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण होते़
नगर तालुका सुखावला
सर्वाधिक टंचाईची स्थिती नगर तालुक्यात निर्माण झाली आहे़ हा तालुका टंचाईग्रस्त जाहीर करण्याची मागणी जोर धरत असतानाच नगर तालुका परिसरातही पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली़ बुधवारीही या परिसरात पाऊस पडला असून, दुसऱ्या दिवशी गुरुवारी नगर तालुक्यांत बहुतांश ठिकाणी पाऊस झाला़ त्यामुळे आता रब्बीच्या पिकाची शेतकऱ्यांनी तयारी सुरु केली आहे.
पारनेर तालुक्यात पाऊस
तालुक्यात अत्याल्प पाऊस झाल्याने टंचाई सदृष्य तालुक्यांत या तालुक्याचा समावेश झाला आहे़ दीड महिन्यांपासून परिसरात पाऊस झाला नाही़ मात्र गुरुवारी पावसाचे आगमन झाले असून, कान्हूर, पानेरी आदी गावांत पाऊस पडला़
तिसगाव परिसरात पाऊस
तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडला़ त्यामुळे परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ तालुक्यातील तिसगाव परिसरात दुपारी सुमारे एकतास जोरदार पाऊस झाला़ त्यामुळे परिसरातील शेती पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकरी सुखावला आहे़
जामखेडमध्ये हलक्या सरी
सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले़ सोसाट्याच्या वाऱ्यासह सायंकाळी जामखेड शहरासह खर्डा, पाडळी, नायगाव, राजूरी, आनंदवाडी, रत्नापूर,पाटोदा आदी परिसरात पाऊस झाला़ या पावसाने खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे़
नेवासा तालुक्यात
काही ठिकाणी पाऊस
गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाचे पुनर्गामन झाले आहे़ बुधवारी सकाळीच काही भागात पाऊस झाला असून, गुरुवारीही काही ठिकाणी पाऊस पडला़ त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे़
श्रीगोंद्यात मध्यम पाऊस
तालुक्यातील घारगाव परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ उशिरा का होईना पण पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे़ (प्रतिनिधी)