घरमालकाचे दागिने चोरून नेणारे पती-पत्नी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:51+5:302021-03-24T04:19:51+5:30
कोपरगाव : भाडेकरू म्हणून राहण्यासाठी आलेल्या एका जोडप्याने घरमालकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या घरातील ११ तोळे वजनाचे सोन्याचे ...

घरमालकाचे दागिने चोरून नेणारे पती-पत्नी गजाआड
कोपरगाव : भाडेकरू म्हणून राहण्यासाठी आलेल्या एका जोडप्याने घरमालकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या घरातील ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात घडली होती. या प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली.
याप्रकरणी घरमालक महेश नारायण कडलग यांनी २१ सप्टेंबर २०१८ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. स्मिता ऊर्फ प्रीती ऊर्फ प्रिया नवनीत नाईक (वय ३६) व नवनीत मधुकर नाईक (४१, दोघे रा. शिवाजी नगर, भांडुप पश्चिम, मुंबई) या दोघांना कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सप्टेंबर २०१८ मध्ये कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील महेश नारायण कडलग यांच्या घरातील खोली वरील पती-पत्नीने भाडोत्री घेऊन घरमालकाचा विश्वास संपादन करून सुमारे साडेअकरा तोळे सोने लुटून पोबारा केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास आतापर्यंत सरू होता. पोलिसांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचा शोध घेतला. अशा प्रकारचे गुन्हे बारामती येथे झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. पती-पत्नी असलेले दोन्ही आरोपी येरवडा कारागृहात असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर कोपरगाव पोलिसांनी या आरोपींना येरवडा कारागृहातून ताब्यात घेत चौकशी केली. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच या चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज काटे, गणेश थोरात, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रीती बनकर, होमगार्ड अमोल दराडे यांनी केला आहे. दरम्यान, या दोन्ही आरोपींना सोमवारी कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, ते दोन्ही आरोपी कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.