भीषण अपघातात पती-पत्नी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:05 IST2019-06-01T13:04:43+5:302019-06-01T13:05:00+5:30
श्रीरामपूर-नेवासा मार्गावर खोकर फाटानजीक गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात भोकर येथील रामकृष्ण भोईटे व त्यांच्या पत्नी रोहिणी यांचा मृत्यू झाला.

भीषण अपघातात पती-पत्नी ठार
श्रीरामपूर : श्रीरामपूर-नेवासा मार्गावर खोकर फाटानजीक गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात भोकर येथील रामकृष्ण भोईटे व त्यांच्या पत्नी रोहिणी यांचा मृत्यू झाला. या तरुण पती-पत्नीच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली.
नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील संतोष निवृत्ती इर्षे हे नातेवाईकांच्या लग्नाकरिता कुटुंबीयांसह (एमएच १५ बीजे ४७२८) छोट्या टेम्पोतून नेवासेच्या दिशेने चालले होते. त्याच वेळी भोईटे हे खरेदीसाठी श्रीरामपूरकडे निघाले होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमी भोईटे यांना प्रथम येथील साखर कामगार रुग्णालय व नंतर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रात्री दहाच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. पत्नी रोहिणी यांचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात निर्मला विठ्ठल कोतकर, टेम्पो चालक संतोष इर्षे, मालन दौलत लकारिया हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत भोईटे यांच्या मागे आई-वडील, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचा लोकसंपर्क होता. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.