शेकडो हेक्टर जमीन येणार ओलिताखाली : निळवंडे धरण कालव्यांच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 14:48 IST2019-06-23T14:48:36+5:302019-06-23T14:48:44+5:30
निळवंडे धरणाच्या प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास सुमारे ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली.

शेकडो हेक्टर जमीन येणार ओलिताखाली : निळवंडे धरण कालव्यांच्या कामाला वेग
हेमंत आवारी
अकोले : निळवंडे धरणाच्या प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास सुमारे ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली. अकोले तालुक्यातील डाव्या कालव्याचे २८ किलोमीटर तर उजव्या कालव्याचे १८ किलोमीटर काम पहिल्या टप्प्यात होत आहे. कालवा खोलीकरण, रुंदीकरणाच्या कामांनी वेग घेतला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे़
लाभक्षेत्रातील अवर्षणप्रवण गावातील शेतकऱ्यांची कालव्यांसाठीची प्रतीक्षा कमी झाली आहे. पूर्वीचे म्हाळादेवी आणि आताचे निळवंडे धरण निर्मितीला ७०च्या दशकात सुरु झाली. ९० च्या दशकात निळवंडे-२ ची जागा निश्चित होऊन ८.३२ टीएमसी क्षमतेच्या धरणाच्या भिंतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. २००८ पासून धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पण अकोले तालुक्यातील कालव्यांची कामे रखडली होती. लाभक्षेत्रातील निळवंडेच्या पाण्याची गेली पाच दशक वाट पाहणाºया वंचित शेतकऱ्यांनी संघर्षाची मशाल पेटवली. त्या संघर्षाचे फलित कालव्यांच्या कामांना १२ जूनला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सुरुवात झाली. निदान आता तरी तिसºया पिढीला निळवंडे कालव्याचे पाणी पहायला मिळेल, यात शंका नाही.
अडीच वर्षाने कालव्यांतून वाहिल पाणी
अकोलेतील बागायत क्षेत्रातून हे कालवे जात असल्याने साहजिकच ज्यांचे बागायत बुलडोझरने तुडवून उद्ध्वस्त झाले, ‘त्या’ शेतक-यांच्या डोळ्यात आसवं आल्याखेरीज राहिली नाहीत. न्यायालयाचा धाक आणि पोलीस बळ यातून अकोलेकरांचा कालव्यांसाठीचा विरोध मावळला. भूमिगत कालव्यांची मागणी विरुन गेली. तालुक्यातील ५७० खातेदार शेतक-यांची उजव्या कालव्यासाठी ११४ हेक्टर तर ९०० खातेदार शेतक-यांची डाव्या कालव्यासाठी १७१ हेक्टर शेतजमीन ८०च्या दशकातच शासनाने संपादित केली आहे. कालव्यांच्या बांधकाम ठिकाणी ३०० फूट तर बांधकाम नसलेल्या ठिकाणी २०० फूट अशी जमीन संपादित केली आहे. सध्या गरजेइतक्याच जमिनीवर कालवे खोदाईचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे अडीच वर्षात कालवे पूर्ण होऊन धरणातील पाणी कालव्यांतून लाभक्षेत्राकडे झेपावेल असे अपेक्षित आहे.
कालव्यांसाठी २८५ हेक्टर जमीन संपादित
तालुक्यातील एकूण २८५ हेक्टर जमीन कालव्यांसाठी संपादित आहे. भविष्यात यातील काही जमीन शेतकºयांना भाडेतत्वावर शेती करण्यासाठी वापरायला देण्याचा सरकारचा मानस आहे. म्हाळादेवी जलसेतूपासून पुढे कालवा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. कालवे बांधकामक्षेञात कलम १४४(३) लागू असल्याने कालवे कामसुरु असलेल्या ठराविक शंभर दीडशे फूटाच्या अंतरात जमावबंदी आदेश आहे. कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे, उपअभियंता मनोज डोके, रोहित कोरे, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे कालव्यांच्या कामांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
अधिकारीपदाचा बडेजाव बाजूला ठेवून कालवाग्रस्त शेतक-यांच्या भावना समजून घेऊन कालवे खोदाईला सुरुवात केल्याने शेतक-यांचा रोष मावळला आहे. शेतकरी सहकार्य करीत असल्याने कामाची गतीही वाढली आहे. कालव्यांची जमीन साफसफाई व सपाटीकरणाचे पहिल्या टप्प्यातले काम पूर्ण झाले आहे. आता कालवा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु आहे. खोदलेल्या कालव्यांमधे कुणीही अतिक्रमण करु नये. -भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता,निळवंडे कालवे विभाग.