काविळचे शंभर संशयित रुग्ण
By Admin | Updated: August 20, 2014 23:30 IST2014-08-20T23:21:38+5:302014-08-20T23:30:29+5:30
अहमदनगर: मैलमिश्रीत पाणी पुरवठा होत असल्याने आगरकर मळा परिसरात तसेच शहराच्या इतर भागात काविळचे शंभर संशयित रुग्ण आढळून आले आहे.

काविळचे शंभर संशयित रुग्ण
अहमदनगर: मैलमिश्रीत पाणी पुरवठा होत असल्याने आगरकर मळा परिसरात तसेच शहराच्या इतर भागात काविळचे शंभर संशयित रुग्ण आढळून आले आहे. या संशयित रुग्णांवर खासगी व महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने या भागात फिरता दवाखाना सुरू केला असून पाईपलाईन लिकेज शोधण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
गत आठवड्यापासून या भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्याचा परिणाम या भागातील नागरिकांना काविळ होण्यात झाला. दूषित पाणी, उघड्यावरचे अन्न पदार्थ खाण्यामुळेच काविळची साथ परिसरात पसरल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. काविळीची साथ अटोक्यात येईपर्यंत आगरकर मळा येथील विरंगुळा मैदानात फिरता दवाखान्यामार्फत आरोग्य तपासणी व उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे. संशियत तसेच अन्य रुग्णांना महापालिकेच्यावतीने मोफत औषध वाटप करण्याचे निर्देश महापौर संग्राम जगताप यांनी दिले. फिरत्या दवाखान्यात बुधवारी २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३८ जण काविळचे संशयित रुग्ण आढळून आले. खासगी दवाखान्यात बुधवारी ११ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय मंगळवारपर्यंत ५० काविळच्या संशयित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भागातील गजानन कॉलनीतील भूमिगत पाण्याच्या टाकाची पहाणी महापौर संग्राम जगताप यांनी केली. या टाक्याची स्वच्छता करावी तसेच मैलमिश्रीत पाणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. मैलमिश्रीत पाणी पुरवठ्याचे कारण सापडत नाही तोपर्यंत टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जगताप यांनी दिले. वसंत टेकडी ते आगरकर मळा दरम्यानची पाईपलाईन लिकेज शोधण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश त्यांनंी दिले. उपायुक्त भालचंद्र बेहेरे, नगरसेविका सुवर्णा जाधव, विजय गव्हाळे, महापालिकेचे सोनटक्के, निंबाळकर यावेळी उपस्थित होते.