जो अपहार आम्ही उघड केला त्यात आम्ही आरोपी कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:07+5:302021-07-11T04:16:07+5:30

अहमदनगर : नगर अर्बन बँकेत झालेला कर्ज अपहार सर्वप्रथम आम्ही उघड करीत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. बँकेने ...

How can we be accused of embezzlement? | जो अपहार आम्ही उघड केला त्यात आम्ही आरोपी कसे ?

जो अपहार आम्ही उघड केला त्यात आम्ही आरोपी कसे ?

अहमदनगर : नगर अर्बन बँकेत झालेला कर्ज अपहार सर्वप्रथम आम्ही उघड करीत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. बँकेने मात्र आमच्याच विरोधात फिर्याद देऊन आम्हांलाच आरोपी केले असून यात आमचा काहीच सहभाग नाही, असा युक्तीवाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या तिघा डॉक्टरांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला.

अर्बन बँकेत झालेल्या २२ कोटी ९० लाख रुपयांच्या कर्ज अपहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. भास्कर सिनारे यांना अटक करीत शनिवारी न्यायालयात हजर केले होते. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने सांगण्यात आले की, अर्बन बँकेतील कर्ज अपहार हा संगनमताने झालेला आहे. हा जनतेचा पैसा आहे. हा अपहार कसा झाला आणि यातील पैसे कुठे गेले याचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. यावर आरोपी पक्षाच्यावतीने ॲड. विक्रमसिंह घोरपडे यांनी युक्तीवाद केला की, एम्स हॉस्पिटलच्या मशिनरी खरेदीसाठी अर्बन बँकेतून तिघा डाॅक्टरांच्या नावे कर्ज मंजूर झाले आहे, ही बाब त्यांना माहीतच नव्हती. २०१६ मध्ये कर्जाच्या हप्त्याची नोटीस आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर तिघा डॉक्टरांनी अर्बन बँक प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन हा अपहार असल्याचे नमूद करीत हे खाते बंद करण्याची मागणी केली होती. तसेच डॉक्टरांच्या नावे मंजूर झालेल्या कर्जाच्या पैशांचे पुढे हस्तांतरण करताना बँकेने त्या डाॅक्टरांना विश्वासात घेतले नाही. आरटीजीएस फॉर्मवर डॉक्टरांची स्वाक्षरी नसताना पैसे दुसऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. तसेच या अपहारात गुन्हा दाखल असलेला डॉ. निलेश शेळके याने २०१८ मध्ये लिहून दिले होते की, या सर्व कर्ज प्रक्रियेला मी जबाबदार आहे. अपहार कुणी आणि कसा केला हे सर्व माहिती असतानाही या प्रकरणी बँकेने २०२० मध्ये आमच्याविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानंतर आम्ही तपासी अधिकारी यांची भेट घेऊन या अपहारातील बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. कर्जापोटी आमची मालमत्ता बँकेकडे गहाण आहे. विशेष म्हणजे या कर्जातील निम्म्यापेक्षा जास्त रक्कम डॉ. शेळके याने भरलेली नाही. उर्वरित रक्कम आमची मालमत्ता विकून बँक वसूल करू शकते. असे असताना या प्रकरणात आम्हांला झालेली अटक योग्य नाही. तसेच आम्हांला पोलीस कोठडीही देऊ नये, असा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने तिघा डॉक्टरांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयात तपासी अधिकारी प्रांजल सोनवणे उपस्थित होत्या.

-----------------------------

निलेश शेळकेला पोलीस कोठडी

दरम्यान, या अपहारात गुन्हा दाखल असलेल्यांपैकी डॉ. निलेश शेळके याला दोन दिवसांपूर्वी अटक झाली असून न्यायालयाने त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. बँकेचे व्यवस्थापक महादेव साळवे हे याप्रकरणातील फिर्यादी आहेत.

Web Title: How can we be accused of embezzlement?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.