कुकडीचा आताच पुळका कसा?-पंकजा मुंडे; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ जामखेडला सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:43 IST2019-10-18T12:42:58+5:302019-10-18T12:43:50+5:30
१५ वर्षे आघाडीचे सरकार होते. तेव्हा ते स्वत: जलसंपदामंत्री होते. त्यावेळी कुकडीचे पाणी या भागाला येऊ दिले नाही. आता ते कसे आणणार? त्यांना आताच कुकडीच्या पाण्याचा पुळका का आला? अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.

कुकडीचा आताच पुळका कसा?-पंकजा मुंडे; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ जामखेडला सभा
जामखेड : १५ वर्षे आघाडीचे सरकार होते. तेव्हा ते स्वत: जलसंपदामंत्री होते. त्यावेळी कुकडीचे पाणी या भागाला येऊ दिले नाही. आता ते कसे आणणार? त्यांना आताच कुकडीच्या पाण्याचा पुळका का आला? अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
जामखेड येथील बाजारतळावर भाजपचे उमेदवार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे , खासदार डॉ. सुजय विखे, शिवसेना उपनेते रमेश खाडे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ राळेभात, नगराध्यक्ष निखिल घायतडक, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, माजी सभापती आशा शिंदे आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, २५ वर्षे सत्तेत असताना यांनी मराठा आरक्षण दिले नाही. आम्ही आरक्षण दिले. यामुळे हा समाज महायुतीच्या बाजूने आहे. पाच वर्षांच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली. राष्ट्रीय महामार्गाची कामे चालू आहेत. हा मतदारसंघ स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा आहे. इकडे राम शिंदे व तिकडे परळीत मी अडचणीत असल्याचे सांगितले जाते, पण एवढी गर्दी पाहून कोण अडचणीत आहे हे सर्वांना समजते. ते जेथे जातात तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होतो अन् मी जेथे जाते तेथे भाजपचा उमेदवार निवडून येतो, अशी टीका त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली.
कॉँग्रेस व राष्ट्रवादीला मेगागळती लागली आहे. त्याची सुरुवात मी सुरेश धस यांना भाजपात घेऊन केली आहे. येत्या २४ तारखेला घड्याळ बंद पडणार आहे. त्यामुळे मत वाया घालू नका, असा टोला मुंडे यांनी लगावला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी, पणन संचालक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, मकरंद काशिद, बंकटराव बारवकर, माजी नगराध्यक्ष अर्चना राळेभात, जिल्हा परिषद सदस्य वंदना लोखंडे, पंचायत समितीच्या सदस्या मनीषा सुरवसे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, शारदा भोरे, विठ्ठलराव राऊत, तुषार पवार आदी उपस्थित होते.