हिवरेबाजार अभ्यासक्रमात हवे

By Admin | Updated: June 2, 2016 01:01 IST2016-06-02T00:55:30+5:302016-06-02T01:01:03+5:30

अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते आहे. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे.

Hoverbazar courses are required | हिवरेबाजार अभ्यासक्रमात हवे

हिवरेबाजार अभ्यासक्रमात हवे

अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते आहे. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे. आता देशात आणि जगातही हिवरेबाजारचे नाव घेतले जात आहे. म्हणूनच हिवरेबाजारमधील विकास आणि जलव्यवस्थापनाचे प्रयोग देशातील सर्व कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामीण विकास पर्यटन केंद्राचे बुधवारी राज्यपाल राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आयोजित समारंभात डॉ. राव यांनी हिवरेबाजारचा गौरव केला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. हिवरेबाजारचा गौरव करताना डॉ. राव म्हणाले, हिवरेबाजार पाहून आणि ग्रामस्थांना भेटून खूप आनंद झाला. इथे आलो ते फक्त प्रेरणा घेण्यासाठी. हिवरेबाजारने जलसंधारणाबाबतच्या अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये हिवरेबाजारचा गौरव केला आहे. जल नियोजन, दुष्काळाशी लढा देणारे गाव म्हणून हिवरेबाजारने जगासमोर आदर्श ठेवला आहे. मराठवाडा दुष्काळाशी सामना करीत आहे. अशावेळी हिवरेबाजारचे काम सर्वांसमोर जाणे आवश्यक आहे़ राज्यपालांनी केली शिवार फेरी... राज्यपालांनी पर्यटन केंद्राबाहेर ‘तामन’ या दुष्काळाशी सामना करणाऱ्या राज्यफुलाच्या झाडाचे रोपण केले. त्यानंतर मोटारीतून शिवारफेरी केली. पगोडा या निरीक्षण मनोऱ्यावरून हिवरेबाजारचे सौंदर्य न्याहाळले. तेथे हातपंपावर तहान भागविली़ ग्राम दर्शन इमारतीसमोरील ‘मन की बात’ या फलकाचे त्यांनी अनावरण केले. हिवरेबाजारची गौरवगाथा चित्रफीतीच्या माध्यमातून जाणून घेतली. ग्रामस्थांनी गुढ्या उभारल्या होत्या़विखे-गांधी जुगलबंदी जिल्ह्यातील ४५ गावे आदर्श करण्याचा मनोदय खासदार गांधी यांनी व्यक्त केला. काम करण्यासाठी ‘तीन वर्ष बचे है’असे खा. गांधी यांनी सांगितले. त्याला उत्तर देताना विरोधी पक्ष नेते विखे म्हणाले, ‘काम करने के लिए तीन वर्षे बचे है, लेकीन आपको बचने के लिए तीन वर्षे काम करना होगा’ असे सांगताच सभागृहाच हशा पिकला. हर्बल पाणी..... हिवरेबाजारचे पाणी आरोग्यदायी असल्याने ते पिण्याचा आग्रह पवार यांनी राज्यपालांना केला आणि त्यांनीही तो लगेच अमलात आणत बोअरचे पाणी पिले़ राम शिंदे यांनी त्यांच्या भाषणात हिवरेबाजारचे पाणी आयुर्वेदिक असल्याचे सांगितले. येथील पाण्यामुळे किडनीचे अपाय होणार नसल्याचा दाखलाही दिला. ‘न्याहरी’साठी अनुदान हिवरेबाजार येथील पर्यटन विकास केंद्रात निवासी न्याहरी योजना सुरू करण्यात येईल, त्यासाठी अनुदान दिले जाईल, असे राम शिंदे यांनी सांगितले़

Web Title: Hoverbazar courses are required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.