घर तेथे डाळिंब आणि डाळिंब तेथे शेततळे
By Admin | Updated: July 1, 2014 00:16 IST2014-06-30T23:33:57+5:302014-07-01T00:16:42+5:30
यमन पुलाटे, बाभळेश्वर सध्या कृषी क्षेत्रावर अस्मानी संकट आहे़ शेतकरी सर्वत्र पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. परंतु याही परिस्थितीत मार्ग काढत
घर तेथे डाळिंब आणि डाळिंब तेथे शेततळे
यमन पुलाटे, बाभळेश्वर
सध्या कृषी क्षेत्रावर अस्मानी संकट आहे़ शेतकरी सर्वत्र पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. परंतु याही परिस्थितीत मार्ग काढत लहरी निसर्गावर स्वार होऊन काही शेतकऱ्यांनी यशस्वी शेतीद्वारे समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. उपलब्ध वातावरण व तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतीक्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या अशाच काही शेतकऱ्यांचा हा शेतीमंत्र कृषिदिनानिमित्त ‘लोकमत’ने जाणून घेतला.
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ या गावात सध्या ८५० एकरांवर डाळिंब लागवड असून डाळिंब क्षेत्राबरोबरच दीडशे शेततळ्यांची निर्मितीद्वारे गाव प्रगतीपथावर आहे़ निसर्गाने मला पाणी दिले नाही, पण मला चांगले हवामान दिले, याचा आनंद असून रडत बसण्यापेक्षा संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती हवी, या विचारातून गावात डाळिंब पिकासाठी शेतकरी सरसावले आणि त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करता येते हे दाखवून दिले. वर्षातील ५ ते ६ महिने पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करणारे हे गाव. परंतु शेतीत नवे प्रयोग करण्याची इच्छाशक्ती व अनुकूल हवामानाच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी डाळिंब शेती यशस्वी करून दाखवली. प्रसंगी टँकरचे पाणीही विकत घ्यावे लागले.
पाणी कमी असेल तर जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, हा संदेश बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रातून मिळाला, त्यातून डाळींब उभे केले़ सुरूवातीला गावात कमी शेतकरी होते़ पण आज घर तेथे डाळिंब आणि डाळिंब तेथे शेततळे अशी डोऱ्हाळे गावाची ओळख झाली आहे, अशी माहिती प्रगतशील शेतकरी दादासाहेब बजरंग आहेर व सुदाम अर्जुन सरोदे यांनी दिली.
शेती फायदेशीर व्हावी, यासाठी आंतरपीक पद्धत आवश्यक आहे़ ऊस हे पीक बागायत शेतकऱ्यास फायदेशीर असले तरी या पिकाच्या समस्या वाढत असताना मशागत तंत्र, लागवड तंत्र, बेसल डोस, बेने प्रक्रिया आणि ऊस पिकामध्ये आंतरपिकांची लागवड केली़ यातून उत्पादन वाढून उत्पादन खर्च कमी झाला़ आज प्रवरा परिसरामध्ये ऊस आणि बटाटा, ऊस आणि कोबी, ऊस आणि कांदा अशी लागवड पद्धतीकडे शेतकरी वळून ठिबक, विद्राव्य खते, जिवाणू खतांचा वापर करत असल्यामुळे एकरी उत्पादन वाढले आहे़
- बन्सी तांबे, (चंद्रापूर) व मच्छिंद्र घोलप (हसनापूर)
प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीबरोबर बोलून तुला काय हवयं, हे समजून घेणे आवश्यक आहे़ शेतकरी जोपर्यंत गोमाता आणि भुमाता समजून घेत नाही, तो पर्यंत शेतकरी समृद्ध होणार नाही़ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पीक उत्पादन तंत्र, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि बाजारपेठ याचा अभ्यास करणे आवश्यक आहे़
-विठ्ठलदास आसावा,
शेतकरी, चंद्रापूर
कृषी दिनावर दुष्काळाचे सावट
मंगळवारी कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून पावसाअभावी कार्यक्रमावर दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यात जून महिन्यांत अवघी पाच टक्क्यांच्या जवळपास पेरणी झाली आहे. ती बहुतांशी बागायत भागात झालेली आहे. शेतकरी हवालदिल असल्याने कृषी दिनावर दुष्काळाचे सावट आहे.
१ ते ७ जुलै दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी मृद व जलसंधारण अभियान राबविणार आहे. यात प्रत्येक उपविभागात पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दिली. पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, पाण्याची टंचाई, चारा टंचाई यावर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा यासाठी शेतकऱ्यांत जनजागृती करण्यात येणार आहे.