नगर शहरासह तालुक्यात तासभर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:57 IST2020-06-12T16:57:39+5:302020-06-12T16:57:44+5:30
नगर शहरासह तालुक्यातील काही भागात, तसेच पारनेर तालुक्यातील सुपा व परिसरात शुक्रवारी दुपारी तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर तालुक्यातील अनेक भागात शेतातून पाणी वाहत होते.

नगर शहरासह तालुक्यात तासभर पाऊस
अहमदनगर : नगर शहरासह तालुक्यातील काही भागात, तसेच पारनेर तालुक्यातील सुपा व परिसरात शुक्रवारी दुपारी तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर तालुक्यातील अनेक भागात शेतातून पाणी वाहत होते.
सध्या मृग नक्षत्र सुरू असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण होत आहे. शुक्रवारी सकाळपासून वातावरणात प्रचंड ऊन व उकाडा होता. त्यामुळे पावसाची शक्यता होती.
दरम्यान, दुपारी दोननंतर नगर शहरात पावसाला सुरूवात झाली. शहरातील सावेडी, केडगाव, एमआयडीसी व मध्य भागात एक ते दीड तास कमी अधिक प्रमाणात सरी बरसल्या. त्याचवेळी नगर तालुक्यातील चास, कामरगाव, वाटेफळ, साकत, गुणवडी, वाळकी, भोरवाडी, अकोळनेर, निंबळक, भिंगार, दरेवाडी आदी भागात अर्धा ते एक तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतातून पाणी वाहत होते.
पारनेर तालुक्यातील सुपा येथे एक तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव, जामखेड तालुक्यातील हळगाव, चौंडी, पिंपरखेड, नान्नज, तसेच भंडारदरा परिसरातही हलक्या सरी बरसल्या.
दरम्यान, हा पाऊस खरीप हंगामासाठी फायदेशीर आहे. बºयाच भागात सध्या खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. तर काही ठिकाणी सुरू आहेत.