नगरमधील कोवीड सेंटरवर गुंडांचा हल्ला; डॉक्टरांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:11 IST2020-10-04T15:11:32+5:302020-10-04T15:11:53+5:30
अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात असलेल्या साई स्पंदन कोवीड सेंटरवर गुंडांनी हल्ला केला. सेंटर समोरील नेटला आग लावली. यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

नगरमधील कोवीड सेंटरवर गुंडांचा हल्ला; डॉक्टरांना धक्काबुक्की
अहमदनगर : शहरातील मार्केटयार्ड परिसरात असलेल्या साई स्पंदन कोवीड सेंटरवर गुंडांनी हल्ला केला. सेंटर समोरील नेटला आग लावली. यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेनंतर कोवीड सेंटर चालविणारे डॉ. रोहित रमेश आहेर यांनी शनिवारी मध्यरात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून विजय आसाराम रासकर, दीपक लक्ष्मण पवार, ऋषिकेश रासकर, आकाश रासकर, विनायक कुलकर्णी, कृष्णा दळवी यांच्या विरोधात मारहाण, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, सार्वजनिक शांततेचा भंग, शासकीय आदेशाचे उल्लंघन आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विजय रासकर, दीपक पवार व विनायक कुलकर्णी यांना अटक केली. मार्केट यार्ड परिसरातील साई स्पंदन कोवीड सेंटर बंद करावे, या उद्देशाने या सहा आरोपींनी सेंटरसमोर असलेल्या हिरव्या नेटला आग लावली. यावेळी जिवाच्या भीतीने येथील लोक सैरावैरा पळू लागले. सेंटरमधील पार्किंग केलेली वाहने ढकलून देत त्यांचे नुकसान केले. घटना समजताच घटनास्थळी कोतवाली पोलिस दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळावरून आरोपी पसार झाले होते.