शंभर रोपे लावून सेवानिवृत्त जवानाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:01+5:302021-07-27T04:22:01+5:30
जामखेड : पिंपळगाव उंडा येथे गावातील लष्करी जवान सेवानिवृत्त झाल्याबद्दल मैत्री ग्रुपने शंभर झाडे लावून त्यांचा सन्मान केला. येथील ...

शंभर रोपे लावून सेवानिवृत्त जवानाचा सन्मान
जामखेड : पिंपळगाव उंडा येथे गावातील लष्करी जवान सेवानिवृत्त झाल्याबद्दल मैत्री ग्रुपने शंभर झाडे लावून त्यांचा सन्मान केला. येथील चन्नप्पा महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून हा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
सुभेदार सुभाष भास्कर ढगे यांनी सैन्य दलात २६ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मैत्री ग्रुपचे अध्यक्ष सागर गवसणे यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. त्यांनी सर्व १०० झाडे जतन करण्याचीही ग्वाही दिली. लष्करी जवानाची गावातून मिरवणूकही काढण्यात आली होती. चन्नप्पा मंदिर, तुळजा भवानी मंदिरासमोर १०० झाडे लावण्यात आली. यामध्ये वड, चाफा, पिंपळ, जांभूळ, नारळ आदी झाडांचा समावेश आहे.
यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, पंचायत समितीचे माजी सदस्य विजयसिंह गोलेकर, सत्कारमूर्ती सुभेदार राजेंद्र ढगे, पत्रकार काव्यंजली माने व ग्रामस्थ उपस्थित होते. मैत्री ग्रुपच्या उपक्रमांची माहिती देताना गवसणे म्हणाले, पिंपळगाव उंडा येथे दरवर्षी मैत्री ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. कोरोनाच्या काळात सॅनिटायझर, किराणा, धान्य, मास्कचे वाटप करण्यात आले.
सुभेदार सुभाष ढगे म्हणाले, २६ वर्षे देशसेवा केल्यानंतर गावी आलो. येथील मैत्री ग्रुपच्या वतीने माझी गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी केलेल्या या सन्मानाबद्दल आभार मानतो. कोरोनाकाळात तरुणांनी हताश न होता जिद्द व चिकाटी अंगीकारून आपले काम चोखपणे करत राहायचे असे आवाहन त्यांनी केले.
------
२६ पिंपळगाव उंडा
पिंपळगाव उंडा येथे वृक्षाराेपण करताना सेवानिवृत्त जवान सुभाष ढगे, राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे, मैत्री ग्रुपचे अध्यक्ष सागर गवसणे आदी.