भारतात हिटलरचा राष्ट्रवाद - विश्वंभर चौधरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 04:48 IST2020-03-02T04:47:56+5:302020-03-02T04:48:04+5:30
ज्यांनी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्य चळवळीत वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला ते आज राष्ट्रवाद शिकवित आहेत,

भारतात हिटलरचा राष्ट्रवाद - विश्वंभर चौधरी
अहमदनगर : ज्यांनी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्य चळवळीत वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला ते आज राष्ट्रवाद शिकवित आहेत, वंदे मातरम म्हणण्याची जबरदस्ती करुन राष्ट्रवादाची प्रमाणपत्रे वाटत आहेत़ भारतीय संविधानात राष्ट्रवाद हा शब्दच नाही़ राष्ट्रवाद ही संकल्पना हिटलरची होती़ तीच संकल्पना आज भारतात राबविली जात आहे, असे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक डॉ़ विश्वंभर चौधरी यांनी सांगितले.
रविवारी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात स्वातंत्र्यसेनानी डॉ़ एस़ टी़ महाले स्मृती पुरस्कार पुणे येथील राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता भंडार व क्रीडामहर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्कार नगर येथील राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक पवार यांना प्रदान करण्यात आला़ राष्ट्रसेवा दल आणि विचारधारा, जिज्ञासा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता़ यावेळी ‘संविधान व राष्ट्रवाद’ या विषयावर विश्वंभर चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
चौधरी म्हणाले, आपली राज्यघटना ही स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारित आहे़ मात्र, राष्ट्रवादाच्या नावाखाली घटनेचा मूळ पायाच नाकारण्याचा डाव घातला जात आहे़ घटनेने जरी वैयक्तिक धर्म स्वातंत्र्य दिले असले तरी घटनेत कोणत्याही धर्माचे नाव नाही़ घटना कोणत्याही धर्माला मान्यता देत नाही़ असे असताना केवळ बहुसंख्यांकांचे हितैषी म्हणून ते राष्ट्रवाद लादत आहेत़ त्यांचा हा राष्ट्रवाद संकुचित आहे, असे ते म्हणाले़