इतिहास घडवणाऱ्यांनी लिहिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:54+5:302021-05-17T04:19:54+5:30

अहमदनगर : ‘आम्ही लढलो-आम्ही घडलो’ न्यायासाठी, हक्कांसाठी, नव्या समाजाच्या निर्मितीसाठी, या प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे व प्रा. डॉ. ...

History makers should write | इतिहास घडवणाऱ्यांनी लिहिले पाहिजे

इतिहास घडवणाऱ्यांनी लिहिले पाहिजे

अहमदनगर : ‘आम्ही लढलो-आम्ही घडलो’ न्यायासाठी, हक्कांसाठी, नव्या समाजाच्या निर्मितीसाठी, या प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे व प्रा. डॉ. अतुलकुमार चौरपगार यांनी संपादित केलेल्या चळवळीतील स्वकथनावर आधारित ग्रंथावर रविवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. इतिहास घडविणाऱ्यांनी लिहिले पाहिजे, असा सूर या परिसंवादात व्यक्त झाला.

परिसंवादाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेची ज्यांनी मुहूर्तमेढ ठेवून चळवळीची सुरुवात केली असे प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे, कॉ. अ‍ॅड. उध्दव भवलकर, काँग्रेसचे राजीव सातव व इतर कोरोना महामारीत मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या परिसंवादामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे (औरंगाबाद) म्हणाल्या, विद्यार्थी चळवळ जेवढी महत्त्वाची तेवढेच कार्यकर्त्यांना जपणेही महत्त्वाचे आहे. अहमदनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी स्वकथन लिहितांना सामान्य वाचकांपर्यंत पोहोचणे व त्यांचे मनपरिवर्तन करणे महत्त्वाचे असते, असे मत व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार अलोक देशपांडे म्हणाले, आज भविष्याकडे बघताना हे पुस्तक एक सांस्कृतिक ठेवा राहील तसेच चळवळींसमोर नेहमीच आदर्श राहील.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. अण्णा सावंत म्हणाले, हे पुस्तक म्हणजे सामाजिक चळवळीचे संहिताकरण कशा प्रकारे केले पाहिजे, याचा एक आदर्श वस्तुपाठ व इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. जेणेकरून असा उपक्रम आपआपल्या भागातील चळवळींचा लेखाजोखा भविष्यात करतील. चित्रकार राजानंद सुरडकर यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेले मुखपृष्ठावरील चित्र वाचकांचे लक्ष वेधून घेते.

या परिसंवादामध्ये प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, गोदावरी महाविद्यालय, अंबड व प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, दादापाटील राजळे महाविद्यालय, आदिनाथनगर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पुरुषोत्तम जुन्ने (अंबड) यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. अतुलकुमार चौरपगार (अहमदनगर) यांनी मानले. विद्यार्थी चळवळीतील विद्यार्थ्यांच्या स्वकथनांवर या परिसंवादामध्ये राज्यभरातून जवळपास १५० मान्यवरांनी व श्रोत्यांनी सहभाग नोंदवला.

Web Title: History makers should write

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.