विरोधकांचे आंदोलन ही त्यांची राजकीय मजबुरी ; दानवेंनी शिर्डीत उडविली नागपूरमधील काँग्रेसच्या मोर्चाची खिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:08 IST2017-12-12T19:04:24+5:302017-12-12T19:08:44+5:30
विरोधकांचे आंदोलन व भाषणबाजी ही त्यांची मजबुरी आहे. लोकांनीच त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते पार पाडीत आहेत. सरकार त्यांच्याकडे लक्ष न देता शेतक-यांकडे लक्ष देत आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी नागपूरमध्ये निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोर्चाची खिल्ली उडविली.

विरोधकांचे आंदोलन ही त्यांची राजकीय मजबुरी ; दानवेंनी शिर्डीत उडविली नागपूरमधील काँग्रेसच्या मोर्चाची खिल्ली
शिर्डी : विरोधकांचे आंदोलन व भाषणबाजी ही त्यांची मजबुरी आहे. लोकांनीच त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते पार पाडीत आहेत. सरकार त्यांच्याकडे लक्ष न देता शेतक-यांकडे लक्ष देत आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी नागपूरमध्ये निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोर्चाची खिल्ली उडविली.
एका विवाह सोहळ्यानिमित्त शिर्डीत आलेल्या खासदार दानवे यांनी साई दरबारी हजेरी लावली. यावेळी आमदार कर्डिले, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजप शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे, दिलीप संकलेचा, गजानन शर्वेकर, रवींद्र गोंदकर, बाबासाहेब डमाळे, प्रकाश चित्ते आदी यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये चांगली परिस्थिती आहे. वातावरण कसेही दिसत असले तरी पहिल्यापेक्षा चांगली स्थिती आहे. उत्तर प्रदेशातही अशीच स्थिती दिसत होती. जवळपास दीडशे जागा निवडून येतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.
राज्यात ९२ हजार बुथ असून २८८ मतदारसंघ आहेत़ प्रत्येक मतदार संघात विस्तारक नेमले आहेत. राज्यात सत्तर टक्के बुथ रचना झाली आहे. नगर जिल्ह्यातही ८५ ते ९० टक्के बुथ रचना पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. साईबाबा संस्थानच्या शताब्दीसाठी राज्य सरकार नक्कीच मदत देईल. याबाबत आपण येत्या २० तारखेला नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलू, अशी ग्वाही दानवे यांनी दिली. शिर्डीच्या कार्यकर्त्यांच्या मी संपर्कात असतो त्यांनी आणलेल्या अडचणी आम्ही सोडवतो असे त्यांनी सांगितले.
...त्यांनाही कर्जमाफी मिळेल
भाजप सरकारने ३४ हजार २०० कोटींची कर्जमाफी केली़ जवळपास नव्वद हजार शेतक-यांना त्याचा लाभ झाला आहे़ शेतक-यांच्या खात्यात पैसे येणेही सुरू झाले आहे. त्यामुळे सरकार विरोधकांकडे नाही तर शेतक-यांकडे लक्ष देत आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत किंवा काहींनी केलेले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी मिळेल, असा दावा दानवे यांनी केला.