हिंदुस्थान अॅग्रो देशात ठरला आदर्श प्रकल्प
By Admin | Updated: July 30, 2014 00:45 IST2014-07-29T23:30:54+5:302014-07-30T00:45:46+5:30
राहुरी : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला रास्त किंमत मिळावी व ग्राहकांनाही ती वस्तू योग्य दरात उपलब्ध व्हावी, या हेतूने केंद्रीय समितीने देशातून आठ आदर्श शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पांची निवड केली.

हिंदुस्थान अॅग्रो देशात ठरला आदर्श प्रकल्प
राहुरी : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला रास्त किंमत मिळावी व ग्राहकांनाही ती वस्तू योग्य दरात उपलब्ध व्हावी, या हेतूने केंद्रीय समितीने देशातून आठ आदर्श शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्रातून वरवंडी (ता. राहुरी, जि. अहमदनगर) येथील हिंदुस्थान अॅग्रो प्रकल्पाची निवड झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आठ मंत्र्यांची एक समिती या प्रकल्पांच्या निवडीसाठी स्थापन करण्यात आली. समितीचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ़ एस़ पी़ सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच वरवंडी येथे येऊन हिंदुस्थान अॅग्रो प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ भारत ढोकणे यांनी शिष्टमंडळाला सविस्तर माहिती दिली. सिंग म्हणाले की, देशात आठ राज्यात आठ शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातून हिंदुस्थान अॅग्रोला स्थान देण्यात आले आहे. अन्नधान्य व शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे़ त्यादृष्टिकोनातून सहकारी तत्वावरील प्रक्रि या उद्योगांची निवड करण्यात आली आहे़
हिंदुस्थान प्रकल्पामध्ये वि-किरण प्रक्रियेद्वारे कृषी माल दीर्घकाळ टिकतो. शेतकऱ्यांच्या मालासाठी प्रकल्प खुला करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासन प्राधान्य देईल, असे डॉ़ सिंग यांनी स्पष्ट केले़ ढोकणे यांनी कांदा साठवणूक गोदाम व प्रकल्पातून एक कंटेनर नुकताच परदेशात रवाना केल्यासंदर्भात माहिती दिली़ यावेळी आऱ श्रीकांत, अनिल सोनार, दत्ता खुळे, श्रीकृष्ण राजदेव, शांताराम खंडागळे, गोरक्षनाथ मोरे उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)
शेतीमालाला योग्य दर मिळावे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येक राज्यात प्रकल्प उभे राहणार आहेत़त्यादृष्टिकोनातून हिंदुस्थान अॅग्रोची निवड करण्यात आली आहे़ शेतमालाची योग्य पध्दतीने साठवण होईल़ त्यातुन नासाडीला आळा बसेल़ केंद्र शासनाबरोबरच शास्त्रज्ञ डॉ़अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे़ सहकारी तत्वावरील हा प्रकल्प पथदर्शक ठरेल़
- डॉ़ भारत ढोकणे, अध्यक्ष हिंदुस्थान अॅग्रो.