महामार्ग दोन तास ठप्प
By Admin | Updated: June 25, 2014 00:32 IST2014-06-24T23:42:18+5:302014-06-25T00:32:14+5:30
पारनेर : टाकळीढोकेश्वर येथील ढोकेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वेळेत बदल करावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थ व पालकांनी मंगळवारी सकाळी नगर-कल्याण महामार्गावर दोन तास आंदोलन केले.
महामार्ग दोन तास ठप्प
पारनेर : टाकळीढोकेश्वर येथील ढोकेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वेळेत बदल करावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थ व पालकांनी मंगळवारी सकाळी नगर-कल्याण महामार्गावर दोन तास आंदोलन केले. आठवडाभरात संबंधिंताबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे टाकळीढोकेश्वर येथे ढोकेश्वर माध्यमिक विद्यालय आहे. येथे वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने सकाळी पाचवी ते दहावी व दुपारी अकरावी, बारावी अशा दोन सत्रात शाळा भरते. मात्र ग्रामस्थ व पालकांनी पाचवी ते दहावीची शाळा सकाळी अकरा ते पाच या वेळेत भरवावी, अशी मागणी करीत आठवड्यापासून आंदोलनाचा पर्याय ठेवला होता. रविवारी पालकांनी सभा होऊन विद्यालयाने गेट बंद ठेवल्याने पालक व विद्यालय यांच्यातील वाद चिघळला.
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता नगर-कल्याण महामार्गावर संभाजी बिगे्रडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे कार्यकर्ते व पालकांनी रास्ता-रोको आंदोलन सुरू केले. दीड तासानंतर प्रभारी तहसीलदार दत्तात्रय बाहुले आले व त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मुख्याध्यापकांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यानंतर मुख्याध्यापक जालींदर खोबरे आंदोलनस्थळी आले. त्यांनी सध्या काहीच निर्णय होणार नाही व माझ्या हातात हा निर्णय नाही, असे सांगितले. त्यामुळे कार्येकर्ते संतप्त झाले व त्यांनी खोबरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.सुमारे दोन तास रास्ता रोको झाल्याने वातावरण तणावपूर्र्ण बनले होते.यावेळी आंदोलक व मुख्याध्यापकांमध्ये शाब्दीक चकमकही झाली. पत्रकार शरद झावरे, उदय शेरकर, तहसीलदार बाहुले, पोलीस सलीम शेख यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून याबाबत तातडीने निर्णय घेताना संस्थाचालक ,पालक, मुख्याध्यापक यांची एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रवाशांचे हाल
महामार्ग दोन तास बंद असल्याने कल्याणकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली. अनेक वाहने अडकून पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. पाण्याचे टँॅकर वाहतूक कोंडीत होते. वाहनांच्या दोन्ही बाजुंनी लांब रांगा लागल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी)
विश्वस्त फिरकले नाही
जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी टाकळीढोकेश्वरचेच रहिवासी आहेत. त्यांनी मुख्याध्यापकांची ढाल करून आंदोलनापासून दूर राहिल्याने आंदोलनस्थळी नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांनी यात लक्ष घातले असते तर हा प्रश्न मार्गी लागला असता, असा आंदोलनकर्त्यांचा सूर होता.