महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘तिचा’ संघर्ष; लोणीव्यंकनाथच्या तरुणीची कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 14:22 IST2020-01-05T14:21:32+5:302020-01-05T14:22:32+5:30
पितृछत्र हरपल्यानंतरही लोणी व्यंकनाथ (ता.श्रीगोंदा) येथील माधुरी अशोक लबडे या मुलीने शेतात काम करून जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘तिचा’ संघर्ष; लोणीव्यंकनाथच्या तरुणीची कथा
बाळासाहेब काकडे ।
श्रीगोंदा : पितृछत्र हरपल्यानंतरही लोणीव्यंकनाथ (ता.श्रीगोंदा) येथील माधुरी अशोक लबडे या मुलीने शेतात काम करून जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे.
माधुरीचे वडील अशोक अकुंश लबडे यांचे दोन वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. कुंटुबांचा आधारवड गेला. त्यामुळे उपासमारी अन् माधुरी व ऋषिकेशचे शिक्षण थांबते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे.आई मंगल शेतीत काम करायची, पण नियोजनाचा अभाव होता. अशा परिस्थितीत माधुरीने वडिलांच्या निधनाने रडायचे नाही तर परिस्थितीवर मात करण्यासाठी लढायचे अशा निर्धार केला.
ऋषिकेशचा शिरूरला अभ्यासक्रम चालू ठेवला. माधुरीने श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एसवाय बीएस्सी प्रवेश घेतला. सकाळी पाच तास कॉलेज आणि दुपारनंतर शेतीत ट्रॅक्टर चालविणे. लिंबोणीच्या बागेला पाणी देण्यापासून लिंबू मार्केटला पोहोचविले अशा सर्व कामांचा बोजा स्वत:च्या खांद्यावर घेतला. माधुरीचे श्रम, आत्मविश्वास आणि नियोजनाने तोट्यातील शेती नफ्यात आणली. तिच्या कष्टामुळे दोघा बहीण भावंडांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी बळ मिळाले. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत होती. अशा स्थितीत शेतीत काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. स्वत:च्या श्रमातून शिक्षण पूर्ण होत आहे याचा आनंद आहे. आता बीएस्सीनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून क्लासवन अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी दिवसा शेती रात्रीचा अभ्यास करण्याची तयारी सुरू आहे, असे माधुरीने सांगितले.