नवी दुचाकी घेताना हेल्मेटच्या सक्तीने ग्राहक हैराण
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:21+5:302020-12-06T04:21:21+5:30
अहमदनगर : चार पैसे जमवून अनेक जण दुचाकी खरेदी करतात. त्यावरील आरटीओ टॅक्स, विमा पॉलिसी, इतर साहित्यामुळे अनेक दुचाकींच्या ...

नवी दुचाकी घेताना हेल्मेटच्या सक्तीने ग्राहक हैराण
अहमदनगर : चार पैसे जमवून अनेक जण दुचाकी खरेदी करतात. त्यावरील आरटीओ टॅक्स, विमा पॉलिसी, इतर साहित्यामुळे अनेक दुचाकींच्या किमती एक लाखाच्या पुढे गेल्या आहेत. त्यात नवी दुचाकी घेताना नवे हेल्मेट घेण्याची सक्ती केली जात आहे. नवे हेल्मेट खरेदी केल्याची पावती जोडल्याशिवाय दुचाकीची पासिंग होत नसल्याने ग्राहकही वैतागले आहेत.
दिवाळी आणि दिवाळीनंतरही जिल्ह्यात हजारो दुचाकींची विक्री झाली. त्या अनुषंगाने हेल्मटही तेवढेच विकले गेले. नव्या दुचाकीसोबत नवे हेल्मेट सक्तीचे केले जात आहे. दुचाकी खरेदी केल्यानंतर चार-दोन दिवसांनी ग्राहकांना पासिंगसाठी शोरूममधून संपर्क केला जातो. तिथेच सर्व कागदपत्रांची फाईल ग्राहकाला दिली जाते. यावेळी मात्र हेल्मेट घेण्याची सक्ती केली जाते. ग्राहक ऐनवेळी इतर दुकानांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला नाईलाजास्तव शोरूममधूनच हेल्मेट विकत घ्यावे लागते. काही शोरूममध्ये ॲक्सेसरीजमध्येच हेल्मेटचा समावेश करून ग्राहकाला वाहनासोबत हेल्मेट दिले जाते, तर काही शोरूमचालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हेल्मेट मोफत देतात. मात्र, हेल्मेट असल्याशिवाय आरटीओकडून नव्या वाहनाची पासिंग केली जात नसल्याने ग्राहकांना ही सक्तीच झाली आहे. प्रत्यक्षात पासिंग करताना शेकडो गाड्या समोर उभ्या असतात. त्यामुळे खरेच हेल्मेट आहे की नाही याची खातरजमाही केली जात नसल्याचे दिसून येते.
-------------
सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांपासूनच नवीन दुचाकी वाहन खरेदी करताना त्यासोबत दोन नवे हेल्मेट खरेदी करण्याचे अनिवार्य केले आहे. मात्र, परिवहन विभागाने किमान एक नवे हेल्मेट खरेदी करणे अनिवार्य केले आहे. या नियमांची दोन वर्षांपासून अंमलबजावणी सुरू आहे. हेल्मेट हे आयएसओ प्रमाणित असावे, अशी अट आहे. मात्र, ते ग्राहकांनी शोरूममधूनच खरेदी करावे, अशी सक्ती नाही.
-दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
----------------
आरटीओंच्या नियमांनुसारच नव्या दुचाकीसोबत हेल्मेट असेल तरच पासिंग केली जाते. त्यानुसार ग्राहकांनी नवे हेल्मेट घेतले की नाही, याची पडताळणी करणे आमची जबाबदारी आहे. नवे हेल्मेट असावे, ते आमच्याकडूनच किंवा विशिष्ट कंपनीचेच खरेदी करावे, अशी शोरूम चालक सक्ती करीत नाहीत.
- अजय पोखरणा, मालक, दुचाकी शोरूम
--
फाईल फोटो- हेल्मेट