महिला रुग्णाची हेळसांड
By Admin | Updated: July 29, 2014 01:04 IST2014-07-28T23:25:18+5:302014-07-29T01:04:03+5:30
अहमदनगर: बाळंतपणासाठी महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या जीवाची प्रचंड हेळसांड झाली.

महिला रुग्णाची हेळसांड
अहमदनगर: बाळंतपणासाठी महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या जीवाची प्रचंड हेळसांड झाली. डॉक्टरांचा हलगर्जीपणा त्यास कारणीभूत असून संबंधित डॉक्टरांना निलंबित करावे, अशी मागणी रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या प्रकाराची विभागीय चौकशी करावी असा प्रस्ताव आयुक्तांना दिला आहे.
महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. जननी शिशु सुरक्षा योजनेचा लाभ रुग्णांना दिला जातो. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने मोफत उपचार होतील या हेतूने स्टेशन रस्त्यावरील कैलास किसन बोरकर यांनी पत्नी मनिषा हिला ११ जुलैच्या पहाटे देशपांडे रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल केले. सकाळी दहाच्या सुमारास तिचे सिझर करण्यात आले. दरम्यान रक्तस्त्राव सुरू झाला. तो थांबविण्यासाठी डॉक्टरांनी गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला. मात्र गर्भाशय काढल्यानंतरही रक्तस्त्राव थांबेना. त्यानंतर मात्र रुग्ण महिलेस अन्य खासगी दवाखान्यात हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना देण्यात आला. घाबरलेल्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात रुग्ण हलविल्यानंतर तेथे जवळपास २० बाटल्या रक्त भरण्यात आले. त्याने महिलेचे पोट फुगले. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून नस बांधण्यात आल्यानंतर रक्तस्त्राव थांबला. मात्र त्यासाठी सुमारे पावणेदोन लाखाचा खर्च आला. बेताची स्थिती असल्याने हा खर्च बोरकर यांना पेलवणारा नव्हता. महापौर दुर्धर निधीतून त्यांना दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली असून राजीव गांधी जीवनदायी योजनेतून मदत मिळते काय? याची चाचपणी केली जात आहे. कै लास बोरकर यांनीही महापालिकेकडे मदतीची मागणी केली आहे. बोरकर हे स्टेशन रस्त्यावरच भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.
ज्या खासगी रुग्णालयात मनिषा बोरकर यांच्यावर उपचार करण्यात आले, तेथील डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर धक्कादायक माहिती दिली. भरलेले रक्त महिलेच्या पोटात उतरले होते. अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळेच दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. देशपांडे रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले.
मनसेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी आयुक्तांना पत्र देऊन देशपांडे रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी वृषाली पाटील यांच्या वैद्यकीय सेवेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांनीही संबंधित डॉक्टरांचे निलंबन करण्याची मागणी उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्याकडे केली आहे.
देशपांडे रुग्णालयात डॉ. पाटील यांच्याकडे मुख्य वैद्यकीय अधिकारी व प्रशासन अधिकारी असे दोन पदाचे पदभार आहेत. जननी शिशु सुरक्षा योजनेमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाटील यांच्याकडून एका पदाचा पदभार काढावा, अशी मागणी सहा महिन्यापूर्वीच करण्यात आली, मात्र आायुक्तांनी त्यास मंजुरी दिली नाही.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी करावी असा प्रस्ताव आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे सादर केला आहे. मुख्य लेखा परीक्षक, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत नेमके काय घडले याची चौकशी करण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. आयुक्त काय निर्णय घेतात याची आता उत्सुकता आहे.
या संदर्भात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. समक्ष भेटल्यानंतरच या विषयावर बोलता येईल, असे सांगत त्यांनी बोलण्याचे टाळले.