हिवरेबाजार मॉडेल पोहचणार तेलंगणाच्या गावागावात
By Admin | Updated: July 16, 2014 00:45 IST2014-07-15T23:33:21+5:302014-07-16T00:45:23+5:30
अहमदनगर : नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याला अनेक संकटांना समोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने दुष्काळ, पंचायत राजचे बळकटीकरण यांचा समावेश आहे.

हिवरेबाजार मॉडेल पोहचणार तेलंगणाच्या गावागावात
अहमदनगर : नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याला अनेक संकटांना समोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने दुष्काळ, पंचायत राजचे बळकटीकरण यांचा समावेश आहे. यावर मात करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हिवरेबाजार गावचे आदर्श मॉडेल राज्यातील प्रत्येक गावात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्राथमिक बैठक झाली असून लवकरच आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत तेलंगाणाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर हे पूर्वी काँग्रेसची सत्ता असतांना देशाचे आरोग्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना आरोग्य विषयक समस्यांची जाण आहे. नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणात सध्या दुष्काळ, पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, पंचायतराज व्यवस्थेचे बळकटीकरण, ग्रामसभेचे महत्व, शासकीय योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आदी प्रश्न आहेत. नगरच्या हिवरेबाजार गावाने राज्यात नव्हे तर देश पातळीवर पाणलोट विकास कार्यक्रम आणि नरेगात आपला ठसा उमटविलेला आहे. तसेच पंचायत राज बळकटी करणासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. यामुळे तेलंगणाच्या ग्रामीण विकासासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी हिवरेबाजारच्या धर्तीवर काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासंदर्भात राव आणि पवार यांची प्राथमिक बैठक झालेली आहे.
हिवरेबाजारमध्ये शेतीच्या पाण्याचे नियोजन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास, ग्रामसभेचा निर्णय अंतिम, गावातील वाद गावात मिटविणे यावर भर देण्यात येत आहे. नशा बंदी, नस बंदी, लोटा बंदी, पाण्याचा ताळेबंद, बोअरबंदी, चराई बंदी आणि श्रमदान या सप्त सूत्रीचा अवलंब करण्यात येत आहे. शासकीय योजनांच्या येणाऱ्या निधीचा दर महिन्याला झालेल्या खर्चाचा तपशील जनतेला देण्यात येत आहे. पाऊस पडण्यापूर्वी, भूगर्भात पाणी मुरविण्यापूर्वी उपलब्ध पाण्याचा ताळेबंद देण्यात येत असून शेतकरी जादा पाण्याची पिके टाळतात. याच धर्तीवर तेलंगणात काम करण्याचा मानस मुख्यमंत्री राव यांनी केला आहे. यासाठी हैद्राबादला अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे त्यांनी पवार यांना सांगितले. या ठिकाणी जिल्हा, तालुका आणि गावनिहाय नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)
राजकारण नको रे बाबा....
चंद्रशेखर राव यांनी पोपट पवार यांना राजकारणात का प्रवेश करत नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले की, समाजकारण आणि जनतेच्या विश्वासावर २५ वर्षापासून हिवरे बाजार गावात काम करीत आहे. हिवरेबाजारला आतापर्यंत ११२ देशातील लोकांनी भेटी दिल्या असून दररोज राज्य आणि देशपातळीवरून ४०० ते ५०० लोक गावाला भेटी देतात. यामुळे राजकारण नको.
या मुद्यावर होणार तेलंगणात काम...
गावातील जमीन बाहेरच्या व्यक्तीला विकू नये
शेतीसाठी बोअरवेल घेण्यावर बंदी
जास्त पाण्याची पिके टाळणे
विहिरीच्या पाण्यावर शेती करायची
विवाहापूर्वी नवरा-नवरीची एड्स चाचणी करणे
दरवर्षी महिलांची हिमोग्लोबीनची तपासणी करणे