हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल सरकारने घ्यावा : राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:14 IST2020-04-20T15:13:40+5:302020-04-20T15:14:45+5:30
वाकडी, चितळी, जळगाव, पुणतांबा गावांमध्ये आमदार विखे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल सरकारने घ्यावा : राधाकृष्ण विखे
राहाता : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.
विखे यांनी वाकडी, चितळी, जळगाव, पुणतांबा आदी गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत सोमवारी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमुळे शेतमालांसंदर्भात निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. त्यावर बोलताना विखेंनी शेतमाल सरकारने खरेदी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली़ यावेळी खासदार डॉ़ सुजय विखे उपस्थित होते.
जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदार संघाबरोबरच परिसरातील गावांमध्येही समाजातील विविध घटकांना सहाय्य केले जात आहे. शासनाच्या व्यतिरिक्तही धान्याचे वितरण केले जात आहे़ यापूर्वी सर्व गावांमध्ये औषधांची उपलब्धता करुन देवून गावांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व गावांचे आरोग्य सर्वेक्षण व्हावे म्हणुन इंफ्रारेड थर्मामिटरची उपलब्धता करुन देण्यात आल्याने या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याचे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे, अशी माहिती विखे यांनी दिली. शासनाकडून धान्य मिळत नसलेल्या व्यक्तींना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून धान्याची उपलब्धता करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.