‘बहुजन हिताय’ ला हरताळ
By Admin | Updated: July 28, 2014 00:51 IST2014-07-27T23:19:59+5:302014-07-28T00:51:53+5:30
पारनेर : पारनेर एस.टी.आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थी, प्रवाशांचे हाल होत आहेत. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेली एस.टी.मात्र याला हरताळच फासत असल्याचे चित्र सध्या आहे.
‘बहुजन हिताय’ ला हरताळ
पारनेर : पारनेर एस.टी.आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थी, प्रवाशांचे हाल होत आहेत. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेली एस.टी.मात्र याला हरताळच फासत असल्याचे चित्र सध्या आहे.
पारनेर शहरात पारनेर महाविद्यालय, न्यू इंलिश स्कूल, सेनापती बापट विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, आय.टी.आय.सह अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातून सुमारे दोन ते अडीच हजार विद्यार्थी रोज पारनेरला येतात.
सुपा, हंगा, भाळवणी, जामगाव, लोणी हवेली, बाबुर्डी, म्हसणे, मुंगशी, भोयरे गांगर्डा, चिंचोली, वडझिरे, पिंपरी जलसेन, करंदी, कान्हूरपठार, सिध्देश्वरवाडी, जवळे यासह परिसरातून येणारे विद्यार्र्थी एस.टी.ने प्रवास करतात. परंतु सकाळी या मार्गावरुन पारनेरकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना एस.टी.त जागाच मिळत नाही. काही मार्गांवर एस. टी. थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. शाळेत उशिरा गेल्यास अनेकदा शिक्षाही होते. काही मार्गांवर चारनंतर बस नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. (तालुका प्रतिनिधी)
प्रवासी वाढवा अभियानाला छेद
एस.टी. वाहक अनेकदा वृध्दांशी अरेरावीने वागून त्यांचा अवमान करतात. एका चौथीच्या मुलीला हंगा येथील शाळेपासून दोन कि़मी.अंतरावर उतरविण्याचा धक्कादायक प्रकारही अलिकडे घडला. असे प्रकार घडत असतील तर एस.टी.ला प्रवासी कसे मिळणार.
- किरण कोकाटे, प्रवासी
विद्यार्थी संघर्ष समितीचे उपोषण
पारनेर एस.टी.आगार प्रमुखाची बदली करावी, विद्यार्थ्यांना सुरक्षित व वेळेवर एस.टी.सेवा मिळावी, वृध्दांवर अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करावी यास इतर प्रमुख मागण्यांसाठी पारनेर तालुका विद्यार्र्थी संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी पारनेर बसस्थानकासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे समितीचे अॅड.गणेश कावरे, महेश गायकवाड, तुषार औटी यांनी सांगितले.
वेळापत्रक कोलमडले नाही
पारनेर आगाराचा कारभार वेळापत्रकानुसारच चालू आहे. वेळापत्रक कोलमडलेले नाही. मुलींच्या बसमध्येच विद्यार्थी गर्दी करतात. त्यांना आणखी किती बस सोडायच्या. मुले उपोषणाचे नाटक करीत आहेत. आम्ही चांगले काम करीत असताना बदलीची मागणी करण्याचा संबंध येतो कुठे?
- अशोक आदिक, आगारप्रमुख, पारनेर
अवैध वाहतुकीचा आधार
पारनेर एस.टी. आगाराचे वेळापत्रक कोलमडल्यानंतर चालक, वाहकांवर गर्दीचा ताण पडतो. यामुळे अनेक चालक, वाहक एस.टी.मार्गांवर प्रवाशांनी हात करूनही थांबत नाही. पारनेर तहसील कार्यालय, पारनेर ग्रामीण रूग्णालय, चिंचोली, गटेवाडी फाटा, पानोेली चौक या परिसरातील थांब्यांवर एस.टी.थांबत नसल्याने प्रवाशांना अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.
चालक, वाहकांची दमछाक
पारनेर आगाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका चालक व वाहकांनाही बसतो. सकाळी शटल गाड्यांंमुळे कमी त्रास होतो, परंतु सायंकाळी अनेक मार्गावर जादा बसेस नसल्याने मुक्कामी बस घेऊन जाणाऱ्या चालक व वाहकांवर चार नंतर विद्यालये सुटल्यानंतर होणाऱ्या गर्दीचा भार पडतो.
अपघाताचे वाढते प्रमाण
बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी होते. अनेकदा प्रवासी दरवाजाला लोंबकळलेले असतात व दरवाजा न लावताच बस पुढे नेण्याचा धोकादायक प्रकार काही चालक करीत असल्याने बसमधून पडून किंवा गर्दीत चेंगराचेंगरी होऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाळवणी येथे तीन मुली जखमी झाल्याची घटना नुकतीच झाली. त्यावेळी दोन तास आंदोलनही झाले.