उत्तीर्ण झाल्याचा आनंद; गेला प्रेयसीला भेटायला, नातेवाइकाने केला खून, आराेपीस अटक
By सुदाम देशमुख | Updated: May 6, 2025 21:55 IST2025-05-06T21:55:07+5:302025-05-06T21:55:26+5:30
Crime News: बारावी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात प्रेयसीला भेटायला गेला आणि प्रेमिकेच्या नातेवाइकाने केलेल्या मारहाणीत त्याचा खून झाला. कुमार वयातील प्रेम मायाजाल ठरले. क्षणात होत्याचे नव्हते झाले.

उत्तीर्ण झाल्याचा आनंद; गेला प्रेयसीला भेटायला, नातेवाइकाने केला खून, आराेपीस अटक
अहिल्यानगर - बारावी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात प्रेयसीला भेटायला गेला आणि प्रेमिकेच्या नातेवाइकाने केलेल्या मारहाणीत त्याचा खून झाला. कुमार वयातील प्रेम मायाजाल ठरले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. नवनाथ तुकाराम पडवळे (वय १९, रा. पांगरी) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
नवनाथ पडवळे हा अकाेले शहरातील माॅडर्न हायस्कूलमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकत हाेता. साेमवारी (दि. ५) निकाल जाहीर झाला. नवनाथ एका हळदी समारंभासाठी तालुक्यातील पळसुंदे या गावी गेला. उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात रात्री साडेअकराच्या दरम्यान पळसुंदे येथे आपल्या प्रेमिकेस भेटायला गेला. प्रेयसीच्या नातेवाइकाने त्यास पकडले व लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. नवनाथ याला उपचारासाठी दवाखान्यात आणले; पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. ६) मयत तरुणाचे वडील तुकाराम भावका पडवळे (४८, रा. पांगरी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश यशवंत दुटे (रा. पळसुंदे) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.