ऑक्सिजन निर्मितीसाठी साखर कारखान्यांचे हात वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:50+5:302021-04-30T04:25:50+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा राज्यात सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातही ऑक्सिजनअभावी अनेकजण गतप्राण झाले ...

ऑक्सिजन निर्मितीसाठी साखर कारखान्यांचे हात वर
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा राज्यात सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातही ऑक्सिजनअभावी अनेकजण गतप्राण झाले आहेत. अशा या गंभीर संकटकाळात सरकारने साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीच्या सूचना केल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील अद्याप एकाही कारखान्याने ऑक्सिजन प्लँट सुरू करण्याच्या हालचाली केलेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या जीवावर उभ्या असलेल्या या कारखान्यांना संकटकाळातही शेतकऱ्यांचे वावडे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव प्रचंड वेगाने झाला आहे. कोरोनाने गावोगाव अनेकांचा बळी घेतला आहे. या संकटकाळात स्वयंसेवी संस्था कोविड सेंटर उभारत आहेत. मात्र, अपवाद वगळता साखर कारखान्यांनी कोविड सेंटर सुरू करून ग्रामीण जनतेवर मोफत उपचार करण्याचेही धारिष्ट दाखवलेले नाही. त्याचवेळी या संकटकाळात कारखान्यांनीही योगदान द्यावे, म्हणून ज्या साखर कारखान्यांचे इथेनॉल प्लँट आहेत, त्या कारखान्यांनी ऑक्सिजन प्लँट उभे करण्याच्या सूचना केल्या आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने याबाबत २३ एप्रिल रोजी पत्र काढले आहे. तसेच ऑक्सिजन प्लँट सुरू केला किंवा नाही, याचा अहवालही मागविला आहे. मात्र, कारखान्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
दरम्यान गुरुवारी दिवसभरात एका प्लँटवरून २० तर, दुसऱ्या प्लँटमधून ३ मेट्रिक टन असा फक्त २३ मेट्रिक टन ऑक्सिजन नगरसाठी उपलब्ध झाला आहे. मागणीच्या तुलनेत निम्माच पुरवठा झाला आहे. सध्या जिल्ह्याला दररोज ६० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता आहे. बुधवारी ६१ मेट्रिक टन ऑक्सिजन नगरसाठी उपलब्ध झाला होता. परंतु, गुरुवारी दिवसभरात २३ मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. शासनाने नगरसाठी दररोज ५० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे निर्देश कारखान्यांना दिलेले आहेत. मात्र त्यानुसार दररोज पुरवठा होत नाही.
....
रिलायन्सनकडून २४ टन ऑक्सिजन
शासनाने नगरसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश नाही. मात्र या कंपनीने बुधवारी २४ मेट्रिक ऑक्सिजन पाठविला होता. परंतु, गुरुवारी दिवसभरात ५० टन ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने पुन्हा तुटवडा निर्माण झाला आहे.
...
नेवासा, शेवगावसाठी रोज ६०० सिलिंडर
नेवासा तालुक्यात ऑक्सिजन तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात दररोज ५०० ते ६०० टाक्या इतका ऑक्सिजन तयार होतो. हा ऑक्सिजन नेवासा व शेवगाव तालुक्यातील रुग्णालयांना पाठविला जात असून, यामुळे या दोन तालुक्यात ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे.
....
संगमनेर, शिर्डी, राहाता, कोपरगावात रस्सीखेच
संगमनेर तालुक्यात २६ मेट्रिक टन लिक्विडपासून ऑक्सिजन तयार करण्याचा कारखाना आहे. यापूर्वी या कारखान्यातून शिर्डी, कोपरगाव, राहाता या तालुक्यांना ऑक्सिजन पुरविला जातो. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या कारखान्यालाही लिक्विडचा पुरवठा हाेत नाही. त्यामुळे या तीन तालुक्यांत ऑक्सिजन मिळविण्यासाठी रस्सीखेच आहे.
......
एमआयडीसी बनले ऑक्सिजनचे केंद्र
पुणे, चाकण, तळोजा येथून आलेले ऑक्सिजनचे टँकर नागापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये उतरविले जातात. तेथून ऑक्सिजनमध्ये रूपांतर करून खासगी रुग्णालयांना वितरीत होते. परंतु, मागणी वाढल्यामुळे तिथे ऑक्सिजन घेण्यासाठी नातेवाइकांच्या रांगा लागतात.
....
या कारखान्यात आहे इथेनॉल प्रकल्प
कै. शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना
सहकारमहर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखाना
अगस्ती सहकारी साखर कारखाना
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना
अशोक सहकारी साखर कारखाना
लाेकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना
मुळा सहकारी साखर कारखाना
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
प्रसाद शुगर, राहुरी
अंबालिका शुगर, कर्जत
गंगामाई शुगर, शेवगाव
श्री साईकृपा शुगर हिरडगाव, श्रीगोंदा