बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:08+5:302021-07-21T04:16:08+5:30
अरुण वाघमोडे अहमदनगर: वैयक्तिक माहिती अपडेट (केवायसी) करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार बँक अथवा कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत बँकेतील ...

बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !
अरुण वाघमोडे
अहमदनगर: वैयक्तिक माहिती अपडेट (केवायसी) करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार बँक अथवा कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत बँकेतील पैशांवर डल्ला मारत आहेत. गेल्या वर्षभरात ओटीपी शेअर व केवायसीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीसंदर्भात येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये साडेतीनशे तक्रारी दाखल आहेत.
मोबाईलचे सीमकार्ड अपडेट करणे, फोन-पे, गुगल-पे ला बँक खाते जोडणे, एटीएम, क्रेडिट कार्डचे नूतनीकरण तसेच बँक खात्याशी आधारकार्ड, पॅनकार्ड लिंक करणे आदी कारणांसाठी सायबर ठग मोबाईलवर संपर्क करतात. बँक अथवा कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे ते भासवितात. बहुतांशी जण अशा बनावट कॉलवर विश्वास ठेवून ते विचारतील ती माहिती विनादिक्कत सांगतात. एटीएम कार्डवरील क्रमांक, बँकेचा खाते क्रमांक तसेच मोबाईलवर येणारा ओटीपी समोरील व्यक्तींना शेअर करताच सायबर ठग खात्यातून ऑनलाईन पैसे चोरतात. काहीवेळेस फोन-पे, गुगलपेच्या माध्यमातूनही क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून फसवणूक केली जाते. पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते.
---------------
फसवणुकीचे अनेक फंडे
सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणुकीबाबत विविध फंडे शोधून काढले आहेत. काहीवेळा गुन्हेगार समोरील व्यक्तीला लिंक शेअर करतात. त्या लिंकवर क्लिक करून पुढील प्रक्रिया करताच बँक खात्यातून पैसे गायब होतात. प्रत्यक्षात बहुतांशी जण पाठवलेली लिंक काय आहे. तसेच त्यावर असलेली माहिती न वाचताच प्रोसेस करत राहतात. त्यामुळे फसवणूक होते.
-----------------
गेलेला पैसे मिळणे कठीण
सायबर गुन्हेगारांनी बँकेतून पैसे चोरल्यानंतर तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क केला तर पैसे मिळण्याची शक्यता असते. पोलीस तांत्रिक माहितीच्या गुन्हेगाराचे बँक खाते बंद करू शकतात अथवा त्या खात्यावरील पुढील व्यवहार थांबवू शकतात; मात्र फसवणूक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी पोलिसांकडे तक्रार केली तर पैसे परत मिळणे कठीण असते. कारण गुन्हेगारांना चोरलेेले पैसे इतरत्र हस्तांतरित करण्यासाठी वेळ मिळतो.
------------------------
कुठलीही बँक ग्राहकाचे खाते अपडेट करण्यासाठी फोनवरून त्याची माहिती मागत नाही अथवा
ओटीपीची मागणी केली जात नाही. त्यामुळे बँक, कस्टमर केअरमधून बोलतोय असा फोन आला तर त्यांना आपली माहिती शेअर करू नये. कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून पुढील प्रक्रिया करू नयेत. तसेच कुठल्याही कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधताना अधिकृत क्रमांक आहे का याची खात्री करावी.
- प्रतीक कोळी, उपनिरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन