पाथर्डी, शेवगाव तालुक्याला गारपिटीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:47+5:302021-03-21T04:20:47+5:30
अहमदनगर/पाथर्डी/शेवगाव/नेवासा : पाथर्डी, शेवगाव, नेवासा तालुक्यात शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळासह गारपीट, पावसाने रबी हंगामातील गहू, हरभरा, ...

पाथर्डी, शेवगाव तालुक्याला गारपिटीचा तडाखा
अहमदनगर/पाथर्डी/शेवगाव/नेवासा : पाथर्डी, शेवगाव, नेवासा तालुक्यात शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळासह गारपीट, पावसाने रबी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकासह फळबागांचे प्रचंड नुकसान केले. गारपिटीने सर्वाधिक नुकसान पाथर्डी, शेवगाव तालुक्यात केले. काही भागांत अगदी चार इंच गारांचा थरही आढळून आला.
वृद्धेश्वर कारखाना (ता.पाथर्डी) पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी शनिवार अक्षरशः घातवार ठरला. दुपारी साडेतीन वाजता अचानकच सुरू झालेल्या वादळी वाऱ्यांसह गारपिटीने कांदा, मका, गहू भुईसपाट झाला. तीन वर्षांनंतर बहरलेल्या आंब्यांच्या कैऱ्यांचा झाडांखाली सडा पडला. जवखेडे आडगाव, कामत शिंगवे, सुसरे, साकेगाव, डांगेवाडी, प्रभूपिंपरी, सोमठाणे आदी भागांत गारांचा चार इंच जाडीचा थर दिसून आला. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पाडळी, चितळी, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, कोपरे आदी गावांतही कापणी केलेला व काढणीयोग्य गहू भिजला. निवडुंगे, आंबेवाडी, धामणगाव, मढी भागात डाळिंबाचा बहर, कळ्या व छोट्याशा आकारातील फळांना बाधा पोहोचली आहे.
कळसपिंप्री, कोरडगाव, कोळसांगवी, सोनोशी, तोंडोळी, निपाणी जळगाव, भुते टाकळी, येळी, मोहज देवढे गावातही मोसंबी, आंबा, गहू, हरभरा, सूर्यफूल आदींचे नुकसान झाले.
शेवगाव तालुक्यातील अमरापूर, आखेगाव परिसरात झालेल्या गारपिटीने सर्वांचीच त्रेधा उडाली. शहरात तुरळक पाऊस झाला. तालुक्यातील शेतकऱ्यांची गव्हाची काढणी, मळणीची लगबग सुरू असताना अचानक झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे नुकसान झाले. काही भागांत वादळाने झाडे, वीज वाहक तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला.
नेवासा तालुक्यातील भेंडा, कुकाण्यासह परिसरात दुपारी चार वाजता मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर तुरळक गाराही पडल्या. २० मिनिटे पाऊस सुरू होता.
-----
खरिपापाठोपाठ रबीचेही मातेरे
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाडजळगाव, शेकटे खुर्द, गोळेगाव, राणेगाव आदींसह परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसासोबत गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये खरिपापाठोपाठ रबी पिकांचे अक्षरशः मातेरे झाले. लाडजळगाव, बारापट्टा तांडा, गोळेगाव, शेकटे खुर्द, राणेगाव या भागातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कांदा, मका, बाजरी आदींसह इतर रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-----
ऊसतोडणी करणारांचीही धांदल..
भावीनिमगाव, दहीगावने, रांजणी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. ऊसतोडणी करणारे मशीन, ऊस वाहतूूक करणाऱ्या गाड्या शेताबाहेर आणाव्या लागल्या. जोरदार वाऱ्याने काढणीला आलेला गहू खाली पडला, तसेच पावसाने भिजल्याने प्रचंड नुकसान झाले. रांजणी परिसरात काही ठिकाणी गारांचाही पाऊस झाला. त्यामुळे कांद्याचेही अतोनात नुकसान झाले.