सर्वांगीण विकासाचे महानायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:13+5:302021-02-06T04:38:13+5:30
शिस्त व विचार सामर्थ्याचे बाळकडू स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय दादाची माणसं घडविणारी शाळा पुराणकालीन गुरुकुलासारखी होती. ओबडधोबड वाटणाऱ्या कठीण दगडाचा ...

सर्वांगीण विकासाचे महानायक
शिस्त व विचार सामर्थ्याचे बाळकडू
स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय दादाची माणसं घडविणारी शाळा पुराणकालीन गुरुकुलासारखी होती. ओबडधोबड वाटणाऱ्या कठीण दगडाचा अनावश्यक भाग छन्नी होतोड्याच्या घावाने ते काढून टाकायचे. शिल्लक राहील तो दगड नव्हे, तर एका दगडातून साकारलेले शिल्प असायचे. कितीतरी कार्यकर्ते नावाची शिल्प दादांनी त्यांच्या कार्यशाळेत घडवली. त्यातील ना.थोरात साहेब हे सर्वात देखण शिल्प ठरले. राज्याने व राष्ट्राने वळून पाहावे असे नेते दादांनी देशाला व राज्याला दिले.
दादांच्या स्वर्गवासानंतर थोरात परिवारातील आम्हा सर्वांशी बोलताना ना.थोरात साहेब म्हणाले होते, ‘दादांच्या शिस्तीला कुठेही ओरखडा ओढला जाईल, असे काम आपण सर्वजण राजकीय, सामाजिक व संस्थात्मक क्षेत्रात कुणीही करणार नाही.’ त्यांचा हा शब्द त्यांनी व परिवारातील आम्ही सर्वांनी पाळला. थोरात साहेबांचे कार्यक्षेत्र इतके व्यापक असूनही शिस्तीचा दीपस्तंभ त्यांनी आजपर्यंत कायम तेवता ठेवला, ज्याला साधी काजळीही लागू दिली नाही. हेच थोरात साहेबांचे राजकीय चारित्र्य आहे.
सत्तेसाठी नाही काँग्रेस विचारांच्या सामर्थ्यासाठी लढा
ना.थोरात साहेब यांचा राजकीय जीवनपट पाहिला, तर सत्तेसाठी ते लढले असे दिसत नाही. काँग्रेसविचार पेरण्यासाठी व प्रवाहित ठेवण्यासाठी त्यांचा लढा काल आणि आजही अविरत सुरू आहे. डाव्या विचारांच्या मुशीत हे नेतृत्व उपजले व घडले. महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, स्व.अण्णासाहेब शिंदे यांचे विचार जगण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला. डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या सहवासात राहण्याची त्यांना संधी मिळाली. विचारांचे सामर्थ्य किती बलशाली असते आणि हेच बल लढायला किती सामर्थ्य देते, याची प्रचिती दोन राजकीय प्रसंगांत दिसून आली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना मा.पवार साहेबांनी १९९९ मध्ये केली. मोठ्या संख्येने काँग्रेस नेते पवार साहेबांच्या बरोबर गेले. थोरात साहेब व थोरात परिवार यांचे मा.पवार साहेबांशी असलेले निकटचे राजकीय संबंध पाहता, महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक धुरंदर नेत्यांना वाटत होते, थोरात साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील. विशेष म्हणजे, असे घडले तर नाही, उलट तसूभरही विचलित न होता, त्यांनी काँग्रेस पक्षाचा बुरुज सांभाळला. तो ढासळू दिला नाही. महाराष्ट्र काँग्रेसचा गड त्यांनीच त्या प्रसंगात त्यांचा राखला. त्यांचा हाच विचार होता की, गांधी परिवाराचा देशासाठी असलेला त्याग, देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले प्राणाचे बलिदान आणि काँग्रेस पक्षाने सर्व जाती-धर्मांना एकत्रित घेऊन एकसंघ ठेवलेला संघराज्याचा हा भारत देश आहे. म्हणूनच गांधी परिवार व काँग्रेसबरोबर राहण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या वैचारिक सामर्थ्याचा प्रत्यय देणारा ठरला. अलीकडच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी सैरभैर झालेली काँग्रेस संघटना ना.थोरात साहेबांनी एकहाती सावरली. प्रांताध्यक्ष म्हणून या काळातील त्यांचे नेतृत्व व खिंड लढविताना दिसून आलेली त्यांची जिद्द कौतूकास्पद होती, तसेच नेतृत्वाचा लागलेला हा कस देशासाठी व राज्यासाठी नेत्रदीपक ठरला. काँग्रेसपक्ष त्यांनी केवळ सावरला नाही, तर काँग्रेस संघटना मजबूत केली.
दूरदृष्टीचे विकासाभिमुख नेतृत्व
राजेशाहीचे काळात राजा दूरदृष्टीचा असेल, तर तो रयतेवर राज्य करीत नसायचा, तर रयतेच्या हृदयसिंहासनावर तो राज्य करायचा. लोकशाहीत लोकनेता दूरदृष्टीचा व संघटना मजबूत करणारा असेल, तर विकासाभिमुख स्वभावातून तो रयतेला समाधानी ठेवून रयतेच्या समाधानातून स्वतःसाठी आनंद मिळवित असतो. ना.थोरात साहेब यांचे नेतृत्व ना पुढाऱ्यांचे ना पेढाऱ्यांचे, ना व्यावसायिक राजकारण्याचे ना जनतेला पिळण्याचे. थोरात साहेब हे नेते आहेत, पण आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाचे ते आधारवड आहेत. प्रत्येक व्यक्तीबरोबरचा सुसंवाद व प्रत्येकाच्या जीवनात समस्येवर मात करणारे त्यांचे नेतृत्व म्हणजे सामान्य माणसासाठीचे कवचकुंडले आहेत. पिण्याचे पाणी असो की, जमिनीसाठी मातीच्या कणाकणावर फिरणारे पाणी असो, दळणवळण असो की विद्युतीकरण, शिक्षण असो की आरोग्य, व्यापार असो की उद्योग, तरुणांच्या हाताला काम असो की बुद्धीला वाव देणारे उपक्रम, शिक्षण असो की रोजगार सहकारी संस्था असो की प्रक्रिया करणारी कारखानदारी. ना.थोरात साहेब यांच्या नेतृत्वातून हे उभे राहिलेले सार्वांगीण विकासाचे सर्वांगसुंदर केंद्र ठरले. विशेष म्हणजे, सडलेल्या राजकारणाची दुर्गंधी येथे नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. संगमनेरची राजकीय संस्कृती ही लोकशाही व्यवस्थेतील इतरांना मार्गदर्शक ठरावी, असी लोकसंस्कृती आहे.
राज्य मंत्रिमंडळातील दिमाखदार कर्तृत्व
मंत्रिमंडळात पहिल्यांदा समावेश होताच, कृषिमंत्रालय मागणारे थोरात साहेब हे खरे शेतकरी नेते आहेत. या खात्याला न्याय मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न हा शेतकरी हिताचा एक जागर होता. सर्वाधिक कृषी उत्पन्न निर्माणाचे शेती धोरण त्यांचेच. नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे पाठीशी उभे राहण्याचे काम थोरात साहेबांचे. जलसंधारणमंत्री म्हणून केवळ रोजगारासाठी जलसंधारण नाही, तर जलसंधारणाचा मूळ उद्देश सफल करण्यासाठी प्रसंगी मशीनद्वारेही कामे करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी जलसंधारण प्रकल्प उभे केले. साखळी बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास इ. कामातून जलसंधारण विभागाला त्यांनी न्याय दिला. भूगर्भातील पाण्याची पातळी उंचविण्यासाठी त्यांचे प्रयत्न कामी आले. रोजगार हमी मंत्रालयाच्या माध्यमातून शेततळ्याची निर्मिती त्यांनी केली. शिक्षण मंत्रालयाकडून इयत्ता दहावीसाठी ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ ही नवीन संकल्पना जन्माला घातली, जिचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला व आजही होतोय. ऑनलाइन शिक्षण प्रणाली, मोफत शिक्षणाची व्याप्ती वाढविणे, माध्यान्ह भोजन योजना कार्यन्वित करणे, शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ इ. योजना त्यांच्याच शिक्षणमंत्री म्हणून केलेल्या कामाच्या साक्षी आहेत. महसूल विभाग सांभाळताना या विभागाला ‘थोरात पॅटर्न’ ठरावा, असे महसूल मंत्रालय त्यांनी साकारले. स्व-आर.आर.पाटील यांच्या नावाने ग्रामीण विकास मंत्रालय ओळखले जाऊ लागले. तसे ना.थोरात साहेब यांच्या नावाने आज महसूल मंत्रालय ओळखले जातेय. राजस्व अभियानापासून महसूल खात्याने आपली बदललेली नवी ओळख राज्याला देत, महसूल विभागाच्या कामाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’पर्यंत पोहोचली.
सरकार व सहकार ही जुळी भावंडे सरकार व सहकार ही जुळी भावंडे आहेत. असे नाते महाराष्ट्रात या दोन क्षेत्रांचे जोडण्यात संगमनेर पॅटर्न यशस्वी झाला आहे. ही दोन्ही साधने राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे ना.थोरात साहेबांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. गाव तिथे सेवा सोसायटी, गाव तिथे दूध डेअरी, गाव तिथे पतसंस्था असे सहकारी संस्थाचे जाळे त्यांनी निर्माण केले. पंचक्रोशीत सहकारी बँकेची शाखा आली. तालुका पातळीवर खरेदी विक्री संघ, दूध संघ, सहकारी साखर कारखाना सर्वांगीण स्वरूपाच्या शिक्षण संस्था इ. संस्था आज सर्वोत्तम पद्धतीने कार्यान्वित आहेत. या संस्थेनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. उदाहरणासाठी पतसंस्था घेता येईल. सहकारी पतसंस्थातील संगमनेर तालुक्यातील एकूण ठेवीचा आकडा चौदाशे कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय राष्ट्रीयकृत बँका व नागरी सहकारी बँका आहेतच. सरकारी तिजोरीतून झालेली विकास कामे विचारात घेतल्यास, हा एक स्वतंत्र विकासाचा लेखाजोखा ठरेल, म्हणूनच सहकार व सरकार या अपत्यांचे पालकत्त्व ना.थोरात साहेब यांचेकडे जाते.
सांस्कृतिक व सामाजिक अभियानाचे अभिसरण
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दंडकारण्य अभियानांतर्गत वृक्षारोपण व संवर्धनाची यशस्वी मोहीम इथे राबविली गेली. कवी अनंत फंदी व्याख्यानमाला इथे चालविली जाते. क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र, अभिनय, योगा व गीतगायन, तसेच संगीत रजनी इ. कार्यक्रमातून सांस्कृतिक क्षेत्र इथे सजविले जातेय. राजकारणही जलसी, द्वेष किंवा टगेगिरीचे नाही, तर सेवाभावी वृतीने केले जाते, हेही नेतृत्वाच्या कल्पकतेतून साकारलेले सहजीवन आहे, हे पाहताना संगमनेर तालुक्याची नवी ओळख डोळ्यासमोर येते. असे नेतृत्व लाभणे हे भाग्याचे लक्षण आहे. हे भाग्य आता महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. ना.थोरात साहेब आज राज्याचे नेतृत्व करीत आहेत. राजकारणातील सात्विक, सोज्वळ व निर्मळ असा सजग मनोवृतीचा विकासाभिमुख दृष्टी असलेला नेता ही त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. राज्यातील माणसा-माणसापर्यंत पोहोचलेले व भावलेले नेते आदरणीय ना.बाळासाहेब थोरात आहेत, यांचा सार्थ अभिमान वाटणे आमच्यासाठी व महाराष्ट्रासाठी स्वाभाविक आहे.
- मधुकरराव नवले,
अध्यक्ष, अभिनव शिक्षण संस्था