धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाविना ग्रामसभा
By Admin | Updated: July 3, 2014 00:58 IST2014-07-03T00:33:14+5:302014-07-03T00:58:43+5:30
कोतूळ : धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाशिवाय सरपंचांनी ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत चक्क मुख्याध्यापकांना सचिव बनवून विशेष ग्रामसभा बोलाविल्याने कोतूळकरांना आश्चर्याचा धक्का बसला.

धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाविना ग्रामसभा
कोतूळ : धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाशिवाय सरपंचांनी ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत चक्क मुख्याध्यापकांना सचिव बनवून विशेष ग्रामसभा बोलाविल्याने कोतूळकरांना आश्चर्याचा धक्का बसला.
याबाबत वृत्त असे, ग्रामदैवत कोतूळेश्वर मंदीर देवस्थानच्या विश्वस्तांची निवड करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांचे कुठलेही आदेश नसताना ग्रामपंचायतीच्या सरपंच इंदिरा गोडे यांनी विशेष ग्रामसभा बोलाविली. परंतू ग्रामसेवक रविंद्र ताजणे हे सुट्टीवर गेल्याने ग्रामसभा बारगळू नये म्हणून गोडे यांनी स्वत:चे अधिकार वापरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भगवंता लोटे यांना लेखी पत्रान्वये सचिव म्हणून काम करण्याचे फर्मान काढले. उपसरपंच गणेश पोखरकर, सीताराम देशमुख, रमेश देशमुख, राजेंद्र देशमुख, मनोज देशमुख, भाऊसाहेब देशमुख, गुलाब खरात, बाळासाहेब घोलप, संतोष चोथवे, प्रकाश देशमुख, निवृत्ती लोखंडे, अशोक देशमुख आदींनी ग्रामसभा योग्य की अयोग्य? असा मुद्दा उपस्थित केल्याने लोटे यांनी काढता पाय घेतला. अखेर कोरमअभावी ही ग्रामसभा रद्द झाली. (वार्ताहर)
कोतूळेश्वर देवस्थान जमिनीचा वाद चालू आहे. त्यामुळे नवीन विश्वस्त निवडीसाठी काही जुन्या विश्वस्तांनी ग्रामसेवकांकडे मागणी केल्यामुळे ग्रामसभा बोलाविली. धर्मदाय आयुक्तांचे पत्र आलेले नव्हते.
- इंदिरा गोडे, सरपंच
ग्रामपंचायतीकडे तातडीची ग्रामसभा घेण्याचे धर्मदाय आयुक्तांचे कोणतेही पत्र नाही. सरपंचांच्या आदेशाने मुख्याध्यापकांना ग्रामसभेचे सचिव करण्यात आले. याची संपूर्ण चौकशी होईल.
- बी.ओ.रानमाळ, विस्तार अधिकारी