ग्रामपंचायत सदस्याची पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:11+5:302021-08-15T04:23:11+5:30

नेवासा : ग्रामपंचायत सदस्याने पोलीस कर्मचाऱ्यास अरेरावी करत मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घोगरगाव येथे घडली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ...

Gram Panchayat member beats police officer | ग्रामपंचायत सदस्याची पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

ग्रामपंचायत सदस्याची पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

नेवासा : ग्रामपंचायत सदस्याने पोलीस कर्मचाऱ्यास अरेरावी करत मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घोगरगाव येथे घडली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब अशोक घोगरे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी रवी पवार यांनी फिर्याद दिली. नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस कर्मचारी पवार घोगरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेले होते. अधिकाऱ्यांना फोन करत असताना ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब अशोक घोगरे हा तेथे आला. तो म्हणाला, अरे पवार तुला आत्ता जाग आली काय? येथे आमच्या गावातील ग्रामपंचायतीचे दिवे कोणी तरी फोडून जात आहे. तू तेथे पोलीस स्टेशनला झोपा काढतो काय? त्यावर पवार यांनी घोगरेंना सभ्यतेने बोलण्याबाबत विनंती केली. मात्र त्याने शिवीगाळ करत पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या अंगावरील गणवेशही फाडला. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य दौलत शिरसाठ व संजय शिंदे यांनी मारहाण करणाऱ्या घोगरे यास बाजूला केले. त्यावेळी घोगरे याने तेथून पळ काढला. पवार यांनी हा प्रकार अधिकाऱ्यांना कळविला असल्याचे पोलीस कर्मचारी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.

Web Title: Gram Panchayat member beats police officer