रिलायन्सच्या साडेसहा कोटीचा हिशोब सरकारने मागितला
By Admin | Updated: May 6, 2016 23:28 IST2016-05-06T23:18:06+5:302016-05-06T23:28:30+5:30
अहमदनगर : भरपाई म्हणून रिलायन्स कंपनीने महापालिकेत भरलेल्या साडेसहा कोटी रुपये खर्चाचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांकडे मागविला आहे.

रिलायन्सच्या साडेसहा कोटीचा हिशोब सरकारने मागितला
अहमदनगर : शहरात केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईची भरपाई म्हणून रिलायन्स कंपनीने महापालिकेत भरलेल्या साडेसहा कोटी रुपये खर्चाचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांकडे मागविला आहे. शाकीर शेख यांच्या तक्रारीनंतर नगरविकास विभागाने हे पत्र पाठविले आहे.
शहरात केबल टाकण्यासाठी रिलायन्स कंपनीने जवळपास ३६ रस्त्यांची खोदाई केली. त्याची नुकसान भरपाई म्हणून कंपनीने महापालिकेकडे साडेसहा कोटी रुपये जमा केले. जेथे खोदाई झाली तेथील रस्ते दुरूस्तीची कामे केली जातील, असे शपथपत्र महापालिकेने खंडपीठात यापूर्वीच दाखल केले आहे. असे असतानाही हे साडेसहा कोटी रुपये परस्पर मूलभूत सोईसुविधेच्या हिस्स्यापोटी भरणाऱ्या रकमेत वर्ग करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी पदाचा दुरूपयोग करून तसेच खंडपीठात शपथपत्र दाखल केलेले असतानाही साडेसहा कोटी रुपयांची रक्कम परस्पर हिश्श्यापोटी वर्ग केली, अशी तक्रार शेख यांनी केली होती. त्यावर नगर विकास विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून वस्तुस्थिती दर्शक अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आयुक्तांनी नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे.
(प्रतिनिधी)
साडेसहा कोटी रुपयांच्या निधी खर्चाबाबत शेख यांनी खंडपीठाकडे अपील केले होते. त्या सुनावणीदरम्यान महापालिकेने शपथपत्र दाखल केले. त्यात ३६ कामांपैकी १६ कामे झाली असून २० कामे ई-निविदा मागवून केली जातील, असे म्हटले आहे. मात्र ई-निविदा प्रक्रिया न करता आयुक्तांनी साडेसहा कोटी रुपयांचा निधी परस्पर मूलभूत सोईसुविधेच्या हिश्यापोटी वर्ग केला आहे. त्याला शेख यांचा आक्षेप आहे.