‘त्यांना’ भोवल्या शुभेच्छा
By Admin | Updated: June 28, 2014 01:12 IST2014-06-27T23:37:05+5:302014-06-28T01:12:25+5:30
श्रीरामपूर : पोलिसांच्या हिटलिस्टवरील गुन्हेगार सागर उर्फ चन्या बेग याच्या वाढदिवसाचे श्रीरामपूर शहरभर शुभेच्छा फलक लावणाऱ्यांविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी प्रथमच गुन्हे दाखल केले.

‘त्यांना’ भोवल्या शुभेच्छा
श्रीरामपूर : पोलिसांच्या हिटलिस्टवरील गुन्हेगार सागर उर्फ चन्या बेग याच्या वाढदिवसाचे श्रीरामपूर शहरभर शुभेच्छा फलक लावणाऱ्यांविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी प्रथमच गुन्हे दाखल केले.
बेग याच्याविरूद्ध गंठण चोरीसह खून व इतर आरोपांवरून ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. २५ तारखेस भल्या पहाटे नागरिकांना श्रीरामपूरच्या गांधी पुतळ्यापासून ते बेलापूर रस्त्यापर्यंत तर थेट नॉर्दन ब्रँचपर्यंत सर्वत्र चन्या बेगच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देणारे फलक दिसले.
काही जागृत नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे व श्रीरामपूरच्या अपर अधीक्षक सुनीता साळुंके ठाकरे यांच्याकडे तक्रारी करीत त्यांचे याकडे लक्ष वेधले. त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना हे फलक काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार खांडेकर यांनी मुंबईत असताना तेथून सकाळीच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकास सूचना देऊन हे फलक काढून टाकण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सकाळी सकाळी हे फलक काढून टाकले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमूड झाला ़ मात्र, रात्री फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत वाढदिवस दिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. याचीही शहरात चर्चा रंगली होती़
(प्रतिनिधी)
पोलिसांची टोलवाटोलवी
दरम्यान या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेऊन पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरपालिकेने या फलकांसाठी परवानगी दिल्याची पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी खात्री केली असल्याचे सांगून शिंदे यांनी पालिका प्रशासनालाच धारेवर धरले.
याबाबत पालिका प्रशासनास विचारले असता या फलकांना पालिकेने परवानगी दिली नव्हती, असे स्पष्ट करण्यात आले. पालिकेने परवानगी दिली नसताना पोलिसांना रात्रीच्या गस्तीदरम्यान हे फलक दिसल्याबरोबर त्यांनी उजाडण्यापूर्वीच हे फलक न काढता पालिकेवर ढकलाढकली केल्याने पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१७ जणांविरूद्ध गुन्हे
पोलीस नाईक सतीश रघुनाथ गोरे यांच्या फिर्यादीवरून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम कलम ३ व ५ प्रमाणे दत्तात्रय खेमनर, संतोष चव्हाण, विजय वाघमारे, महेश शिंदे, सोनू बेग, संदीप माळवे, तिलक सोनार, भैय्या उर्फ मनोज भिसे, अक्षय गाडेकर, सनी जाधव, टिपू बेग, आनंद पाटील, निखिल सानप, संघर्ष दिघे, अभिजीत लिप्टे, सँडी उर्फ संदीप पवार, कल्पेश चोरडिया या १७ आरोपींविरूद्ध २५ जूनला पहाटे साडेचार वाजेपूर्वी या आरोपींनी चन्या उर्फ सागर बेग याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावून श्रीरामपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण केल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. सहायक मनोजकुमार राठोड तपास करीत आहेत.