निष्ठावंतांनाच द्या आमदारकीचे तिकीट
By Admin | Updated: June 13, 2014 01:13 IST2014-06-13T00:43:24+5:302014-06-13T01:13:54+5:30
श्रीगोंदा : विधानसभा निवडणूक आली की विरोधातील बड्या नेत्यांना युतीचे घर दिसते. निवडणूक झाली की नेते स्वगृही होतात.

निष्ठावंतांनाच द्या आमदारकीचे तिकीट
श्रीगोंदा : विधानसभा निवडणूक आली की विरोधातील बड्या नेत्यांना युतीचे घर दिसते. निवडणूक झाली की नेते स्वगृही होतात. आता दगाबाज नेत्यांना दरवाजे बंद! निष्ठावंतांना आमदारकीचे तिकीट द्यावे. त्यांचे काम इमानदारीने करण्याचा निर्णय महाआघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
श्रीगोंदा येथे गुरुवारी महाआघाडीतील पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपाशी दगाबाजी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घन:श्याम शेलार व श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यावर टिकेची झोड उठविली. मात्र, कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप व बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याबाबत जहाल नेत्यांनी मवाळ भूमिका घेतली.
भाजपाचे नेते राजेंद्र म्हस्के म्हणाले की, मला उपसभापती होण्याची संधी होती़ परंतु काँग्रेस नेत्यांनी विरोध केला. २००९ मध्ये भाजपाने त्यांना आमदारकीचे तिकीट बहाल केले होते हे ते विसरले, असा टोला मारला.
सेनेचे बाळासाहेब काटे म्हणाले, भाजपाला खासदारकीचे तिकीट दिले आता शिवसेनेचे प्रा. शशिकांत गाडे यांना आमदारकीची संधी द्यावी़ तुम्ही दिल्लीत आम्ही मुंबईत काम करू.
इतर नेत्यांनी महाआघाडीला देशात चांगले दिवस आले आहेत़ त्यामुळे आता महाआघाडीचे नेते आमदारकीबाबत ज्यांना संधी देतील त्यांचे काम करू. आमदार महाआघाडीचाच झाला पाहिजे यावर मत मांडण्यात आले. यावेळी गौतम घोडके, संतोष लगड, भाऊसाहेब गोरे, बाळासाहेब महाडिक, नंदकुमार ताडे, दत्ता हिरनावळे, भूषण बडवे यांची भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)
महाआघाडीत गटबाजी
श्रीगोंदा तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुवर्णाताई पाचपुते यांनी महाआघाडीच्या बैठकीकडे पाठ फिरविली. सुवर्णा पाचपुतेंनी भाजपाच्या तिकिटासाठी मुंबईपर्यंत लॉबींग केले आहे. स्थानिक पातळीवर तिकीट जाहीर होण्यापूर्वी गटबाजी उफाळल्याचे संकेत श्रीगोंद्यातील बैठकीतून स्पष्ट झाले आहेत.