मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन रेखा जरे यांना न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST2020-12-31T04:21:54+5:302020-12-31T04:21:54+5:30
जरे यांच्या हत्येच्या घटनेला एक महिना झाला. यानिमित्त बुधवारी सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील भिंगारवाला चौक ते माळीवाडा बसस्थानक येथील ...

मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन रेखा जरे यांना न्याय द्या
जरे यांच्या हत्येच्या घटनेला एक महिना झाला. यानिमित्त बुधवारी सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील भिंगारवाला चौक ते माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, सामाजिक कार्यकर्ते गरीश कुलकर्णी, मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर, जनआधार संघटनेचे प्रकाश पोटे, मंगला भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या निलिनी गायकवाड, तृतीयपंथी संघटनेच्या अध्यक्षा काजलगुरू, साहेबान जहागीरदार, मयत जरे यांचे कुटुंबीय यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, यशस्विनी महिला ब्रिगेड व विविध संघटनांच्या माध्यमातून रेखा जरे
यांची सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका होती. त्यांच्याबाबत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांचे कुटंब उघड्यावर पडले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. जोपर्यंत रेखाताई यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सारे लढत राहू, असे ते म्हणाले. गिरीश कुलकर्णी म्हणाले रेखा जरे यांची सुपारी देऊन निर्घृण पद्धतीने हत्या झाली. या घटनेनंतर विशेष कुणी आवाज उठवलेला दिसत नाही. आता जागरूक नागरिकांनी पुढे येऊन या घटनेचा निषेध नोंदवावा. कुणालाही न घाबरता थेट रस्त्यावर येऊन व्यक्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
रुणाल जरे यांना अश्रू अनावर
कॅन्डल मार्चदरम्यान मयत जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनीही मनोगत व्यक्त केले. महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या सर्वाधिक घटना नगर जिल्ह्यातच का घडतात, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलिसांच्या तपासाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी रुणाल यांना अश्रू अनावर झाले होते.
महिलांच्या नावे बोठे याने परस्पर दिले होते निवेदन
तत्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची बदली व्हावी, असे निवेदन तयार करून बाळ बोठे याने माझ्यासह काही महिलांची परस्पर त्या निवेदनात नावे टाकली होती. याबाबत आम्ही बोठे याला जाब विचारला होता. असा खुलाला कॅन्डल मार्चदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या निलिनी गायकवाड यांनी केला. यावेळी काजलगुरू, देविदास खेडकर व मंगल भुजबळ यांनीही बोठे याच्या कृत्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली.
पोलीस उतारेगी उसका नकाब
केहता था जो खुद को नगर का नवाब, पोलीस उतारेगी उसका नकाब, मिटती नही रेखा किसीके मिटाने से आजभी जिंदा है वो सच्चाई के पैमाने पे, रेखा जरे यांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, पुलिस प्रशासन जिंदाबाद कातील अब नही रहेगा आजाद, असे निषेधाचे फलक घेऊन अनेक तरुण-तरुणी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते.
फोटो ३० रेखा जरे
ओळी- विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून मयत रेखा जरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.