प्रेम’ असल्याचे सांगून तरुणीवर मैत्रिणीच्या भावाचा अत्याचार
By शिवाजी पवार | Updated: November 28, 2023 16:04 IST2023-11-28T16:03:27+5:302023-11-28T16:04:24+5:30
व्हिडीओ व्हायरलची धमकी, आरोपी तरुणाला अटक.

प्रेम’ असल्याचे सांगून तरुणीवर मैत्रिणीच्या भावाचा अत्याचार
श्रीरामपूर : शहरातील एका १८ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या भावाने अत्याचार केला. तिचे बळजबरीने छायाचित्रे व व्हिडीओ काढत ते प्रसारित करण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीचे नाव दानिश मन्सुरी आहे. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मैत्रिणीच्या घरी बारावीच्या परीक्षेचे मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका संच घेण्यासाठी तरूणी गेली असता आरोपी दानिश याने तरुणीवर बळजबरीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत अत्याचार केला.आरोपी हा महाविद्यालयात पुढच्या वर्गात शिक्षण घेतो. मैत्रिणीचा भाऊ असल्यामुळे त्याच्याशी ओळख होती. त्याचाच आरोपीने गैरफायदा घेतला. तरुणीला छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यातून घरी भेटायला येण्याचे सांगत अनेकदा अत्याचार केले. बदनामीच्या भीतीने तरुणीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली नाही.
आरोपी दानिश याने तरुणीला फोन करून हॉटेलमध्ये भेटायला येण्याची गळ घातली. अन्यथा छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तेथे तिचा विनयभंग करण्यात आला. अखेर त्रास असह्य झाल्याने तिने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे व निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली.